लोणी दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):–गावांचा व खेड्यांचा विकास करावयाचा असेल तर, खेड्याकडे चला हा मूलमंत्र महात्मा गांधीनी घालून दिला आहे, हा मुलमंत्र आत्मसात करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी प्रतिपादन केले.
औरंगपूर (ता. संगमनेर ) येथे लोणीच्या पद्यश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागाचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे. सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास केला पाहिजे, परंतु यामध्ये अडथळे निर्माण केल्यास गावचा विकास थांबून जातो.गावच्या विकासाकरिता गावामध्ये व्यसनमुक्ती होणे आवश्यक असते. एखादा पती आपल्या पत्नीला दारु पिऊन मारहाण करीत असेल तर सर्वांनी त्या स्त्रीची मदत केली पाहिजे. कोणीही दारुच्या अथवा इतर व्यसनाच्या अधिन होऊ नये, व्यसनमुक्तीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवकांनी गावामध्ये जनजागृती केली पाहिजे. गावांमध्ये गायांचे शेण उपलब्ध असते, त्यापासून गोबरगॅस विकसित करण्याचा तसेच सौरऊर्जेचा वापर केला पाहिजे.शिबीरार्थी विद्यार्थीनी गावातील महिलांना त्यांचे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे, खेड्यातील अनेक स्त्रीयांना त्यांचे ब्लड ग्रुप कोणते आहेत हेच माहिती नसते, त्याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाबाबत विद्यार्थ्यांना महत्व विषद करण्यास सांगितले. तेंव्हा कु. सृष्टी खोत या विद्यार्थीनीने सांगितले की, ‘माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी’ हे या योजनेचे बोधवाक्य आहे. ते आपणाला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. या बोधचिन्हाच्या मध्यभागी चक्र असून त्या चाकास आठ आरे आहेत, ते २४ तासांचे प्रतिनिधीत्व करतात (अष्टौप्रहर म्हणजे २४ तास) जी व्यक्ती हे बोधचिन्ह लावते, तिला हे बोधचिन्ह जाणीव करून देते की, तो रात्रंदिवस २४ तास राष्ट्रसेवेसाठी तत्पर आहे. बोधचिन्हामधील लाल रंग हे तरुणांच्या उसळल्या रक्ताचे प्रतिक आहे. त्यातून जिवंतपणा दर्शविला जातो. निळा रंग हा आकाशाचे प्रतिनिधीत्व करतो. अथांग आकाशातील एक अंश म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. बोधचिन्ह लावले म्हणजे स्वयंसेवक आपला थोडा वेळ मानव कल्याणासाठी देण्यास तयार होतो.
यावेळी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास सुर्यभान तांबे पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करन शिबीरार्थीना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या शिबीरांचा गावच्या विकासाकरिता जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. दि.२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्री.राम मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने गावांमधील सर्व मंदिरांची साफसफाई करावी.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ.बाळासाहेब मुंढे यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.आर.ए, पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व व संकल्पना ‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास व लोकसंख्या नियंत्रण जनजागृती’ या बाबत थोडक्यात संकल्पना विषद करन सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे, उपप्राचार्य डॉ. अनिल वाबळे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष विजय सावळेराम डेंगळे, औरंगपूरच्या सरपंच सौ.लक्ष्मी भाऊसाहेब वाकचौरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्र्य विठ्ठल तळोले, पोलिस पाटील दत्तात्र्य बाबुराव तळोले विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक डेंगळे, व्हा. चेअरमन राजेंद्र रामदास तळोले इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. एस.आर. लामखेडे, डॉ.डी.एस.तांबे, प्रा.पी.एल. हराळे, डॉ. एस.आर.सुसर, प्रा एस.एस. शेख, प्रा.डी.एस. औटे, प्रा.एस.एस.लोखंडे, प्रा. डॉ.एस.आर. गाढवे हे विशेष प्रयत्न करीत आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. सुरभी भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विजय खर्डे यांनी केले.