नेवासा दि.२० ( जनता आवाज वृत्तसेवा ):-ज्ञानेश्वर सृष्टी तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या पंचवीस कोटी रुपयांचा निधी यापुर्वीच मंजूर केला आहे.परंतू पंढपूरच्या धर्तीवर श्रीक्षेत्र नेवासाच्या विकासाचा काॅरिडाॅर तयार करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द राहील आशी ग्वाही महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंत्री विखे पाटील यांनी नेवासा येथे येवून माउलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले.स्वच्छता कर्मचार्यांशी त्यांनी संवाद साधला.मंदीर देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.माजी आमदार पांडूरंग अभंग बाळासाहेब मुरकुटे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे सरचिटणीस नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदीर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने तिर्थ स्थानांच्या विकासाला अधिक प्राधान्य दिले आहे.तिर्थक्षेत्रांचा विकास करून त्या भागामध्ये रोजगाराची निर्मिती करण्याचे धोरण राज्य सरकारचे आहे.पंढपूर तिर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी २७००कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.भंडारा डोंगरच्या विकासाची प्रक्रीया वेगाने सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र नेवासा या तिर्थस्थानांचे महत्व खूप मोठे आहे.पसायदानाच्या माध्यमातून विश्वासाठी प्रार्थाना करणार्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थानाचा विकास करताना निधीची करमरता कुठे कमी पडणार नाही.खरे तर या स्थानांचा विकास यापुर्वीच होणे गरजेचे होते.पण आता नव्या पिढीला आपल्या अध्यात्मिक परंपरेची माहीती होण्यासाठी ज्ञानेश्वर सृष्टी उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,आता पंढरपूरच्या धर्तीवर या तिर्थक्षेत्रांच्या विकासाचा काॅरिडाॅर निर्माण करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे निर्मीती ही हिंदू धर्माच्या अस्मितेचे प्रतिक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्या पिढीला मिळाले असल्याचे सांगून विखे पाटील म्हणाले की या मंदीर लोकार्पणाच्या कार्यक्रमाचा आनंदोत्सव गावोगावी साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे पांडूरंग अभंग यांचेही भाषण झाले.कार्यक्रमास नेवासा तालुक्यातील कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील राम मंदीर आणि श्री मोहनीराज मंदिरात विखे पाटील यांनी कार्यकर्त्या समवेत दर्शन घेतले.