अकोले दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-भंडारदारा आणि निळवंडे धरणाच्या उभारणीसाठी अकोलेकरांनी केलेला त्याग खूप मोठा आहे.धरण आणि कालव्यांच्या कामासाठी जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचा पुढाकार कोणीही नाकारू शकणार नाही.जलनायक कोणीही होत असले तरी “नथनीच कौतुक करून घेणार्यांनी नाक देणार्याला विसरून नये” असा टोला महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोध्ये मधील प्रभू श्रीराम मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून निळवंडे धरणांच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.जेष्ठ नेते मधुकरारव पिचड खा.डॉ सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले माजी आमदार वैभव पिचड सीताराम गायकर भाजपाचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे जलसंपदा विभागाचे बाळासाहेब शेटे कैलास ठाकरे यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कालव्यावरील पुलाला श्रीराम जलसेतू नाव देण्याची घोषणा मंत्री विखे पाटील यांंनी केली.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा संघर्ष करावा लागला.पण आता पाण्याची प्रतिक्षा संपली आहे.डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यावरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरूवात झाल्यामुळेच पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात यश आले.
धरणाचे आणि कालव्याचे काम अकोले तालुक्यात होते पण खालच्या भागातच आंदोलन सुरू होती. धरण आणि कालव्यांचे काम पूर्ण होण्यासाठी मधुकरराव पिचड यांचे योगदान खूप मोठे आहे. या भागातील शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या नसत्या तर प्रकल्प सुध्दा उभा राहू शकला नसता.या भागातील शेतकऱ्यांच्या त्यागामुळेच भंडारदारा निळवंडे प्रकल्प उभे राहीले.लाभक्षेत्राातील तालुक्याची समृध्दता या प्रकल्पामुळे असल्याचे नमूद करून प्रधानमंत्री या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास आले तो दिवस आपल्या सर्वासाठी महत्वपूर्ण होता.आज विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मूर्तीच्या स्थापनेच्या दिवशी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.या कामाचे श्रेय घेवून कोणीही जलनायक खलनायक होत असले तरी नथनीचे कौतुक करणाऱ्यांनी नाक देणार्याची आठवण ठेवावी असा टोला विखे पाटील यांनी लगावला.
डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर तालुक्यतील काही गावात शेतकऱ्यांचे नूकसान मोठ्या प्रमाणात झाले.त्याच्या नूकसान भरपाईचे प्रस्ताव महामंडळाच्या नियामक मंडळाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून या नूकसानीची मदत लवकर मिळावी याकरीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती करणार आहे.शेतकऱ्यांच्या दळवळणा करीता १२३ लोखंडी पुलाची मागणी असून या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
माजी मंत्री मधुकराव पिचड यांनी धरण आणि कालव्यांच्या कामाच्या वाटचालीचा आढावा घेवून अनेकांच्या त्यागाने प्रकल्प उभे राहीले आहेत.मधुकर पिचड यांनी काय केले असा प्रश्न करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतानाच तालुक्यात झालेले काम हीच कामाची साक्ष असल्याचे सांगून पुढच्या पिढीने या कामाचा वारसा पुढे घेवून जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले माजी आमदार वैभव पिचड यांची भाषण झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता कैलास ठाकरे यांनी केले.
रामायणात महर्षी अगस्ती ॠषीं आणि प्रभू श्रीरामांच्या झालेल्या भेटीचा संदर्भ देवून विखे पाटील म्हणाले की,आज आयोध्येचा ऐतिहासिक कार्यक्रम आणि अगस्ती ॠषीच्या भूमीत होत असलेला पाणी सोडण्याचा कार्यक्रम योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.
रामनामचा जयघोष करीत उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले.कालव्यावरील पुलाला श्रीराम जलसेतू नाव देण्यात आल्याची घोषणाही विखे पाटील यांनी करून या नावाला राज्य सरकार तातडीने मान्यता देईल प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.