टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- अयोध्या येथील श्रीराम मंदिरात राम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त टाकळीभान येथील पुरातन श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
अखंड भारतासाठी हा सोहळा एक अलौकिक अमृतानुभावाचा अभूतपूर्व सोहळा असल्याने या निमित्त व या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील पुरातन श्रीराम मंदिरात दिनांक २२ रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त सकाळी श्रीराम मंदिरात श्रीराम, सितामाता, लक्ष्मण हनुमान यांना गंगाजलाने स्नान , अभिषेक व पूजा करण्यात आली. श्रीरामरक्षा करण्यात आली. सकाळी १० वाजता पाना फुलांनी सजविलेल्या रथातून प्रभु श्रीराम यांची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत श्रीराम, सिता लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा परिधान केलेली मुले, बँड पथक, डोलीबाजा, लेजीम पथक, भजनी मंडळ, ग्रामस्थ, भाविक मिरवणूकीमध्ये मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती गुरूवर्य भास्करगिरी महाराज यांची टाकळीभान येथे २००७ साली १७ वर्षांपुर्वी हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती त्यावेळी मिरवणूकीत झालेली गर्दी व उत्साह आज काढण्यात आलेल्या प्रभू श्रीराचंद्रांच्या मिरवणूकीत पहावयास मिळाला असून आज काढलेली प्रभू श्रीरामचंद्रांची मिरवणूक खास आकर्षण ठरली आहे.
मिरवणूकी नंतर १२ वाजून २९ मिनिटांनी व याशुभ मुहूर्तावर प्रभु श्रीरामांची महा आरती करण्यात आली. आरती नंतर उपस्थित भाविकांनी प्रभू रामचंद्रांचा जयजयकार करण्यात आल्याने सर्व परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर साबूदाना खिचडी व राजगिरा लाडूचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.
दुपारी श्रीराम मंदिरात पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी भजनाचा कार्यक्रम केला. मंदिरात संध्याकाळी दिपोत्सव साजरा करण्यात आला.
या सोहळ्या निमित्त श्रीराम मंदिरात फुलांची आरस व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच गावातील सर्व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्रीराम मंदिरासमोर मंडप व कमान टाकण्यात आली होती व मंडपामध्ये अयोध्या मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळा थेट प्रक्षेपन पाहण्यासाठी स्र्किन लावण्यात आली होती. संध्याकाळी श्रीराम मंदिरा समोर फटाक्यांची व शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली.
श्री.क्षेत्र देवगड संस्थांनचे मठाधिपती भास्करगिरीजी महाराज यांनी केलेल्या अवाहना नुसार ग्रामस्थांनी २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलेला घेतल्याने ग्रामस्थांनी घरापुढे सकाळी व संध्याकाळी शेणाचा सडा, घरासमोर रांगोळी, घरावर भगवा ध्वज, घरावर आकाश कंदिल, संध्याकाळी घरात व घरासमोर पणत्या लावून दिपोत्सव साजरा करून दिवाळी साजरी करण्यात आली.