कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) : –अयोध्येमध्ये सोमवारी (२२ जानेवारी) होणाऱ्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात रविवारी (२१ जानेवारी) सायंकाळी वाजतगाजत भव्य भगवा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमितभैय्या कोल्हे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह सहभाग नोंदवला. ही रॅली शहरातून परिक्रमा करीत असताना ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी अवघे शहर दुमदुमून गेले होते.
पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येच्या पवित्र भूमीत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. या श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्येतील हा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्यदिव्य असा होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झाले असून, श्रीरामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. यानिमित्ताने देशात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगाव शहरात श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा समिती, समस्त कोपरगाव व सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी सायंकाळी भव्य भगवा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाच्या बैठकीत विवेकभैय्या कोल्हे यांनी या रॅलीची संकल्पना मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेचे सर्वांनी स्वागत करत आज रविवारी या रॅलीचे आयोजन केले होते. शहरातील विघ्नेश्वर चौकातून या रॅलीस प्रारंभ झाला. गळ्यात भगवे उपरणे, डोक्याला भगवे फेटे बांधून भगवे झेंडे फडकावत निघालेल्या या मोटारसायकल रॅलीमध्ये श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रॅलीमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून फटाके वाजवून रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वैशिष्ट्यपूर्ण रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
या रॅलीमध्ये युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, सुमितभैय्या कोल्हे यांच्यासह सकल हिंदू समाज, श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा समितीचे कार्यकर्ते, भाजप व इतर विविध पक्ष, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, श्रीराम भक्त व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गंगा गोदावरी महाआरती, भजन संध्या, लेझर शो, फायर शो, रॉक बॅंड शोला मोठ्या संख्येने उपस्थित रहा-विवेकभैय्या कोल्हे
श्री रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभर राममय वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. उद्या २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळ्यात कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे. तसेच यानिमित्ताने उद्या सोमवारी सायंकाळी कोपरगाव शहरात पवित्र गोदावरी नदीकाठी गंगा गोदावरी महाआरती होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भजन संध्या, लेझर शो, फायर शो, रॉक बॅंड शो आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सकल हिंदू धर्मियांच्या बैठकीत बाईक रॅली काढून अयोध्या राममंदिर सोहळ्याचे स्वागत करावे अशी कल्पना मांडली होती त्याचे आज समस्त संघटनी व युवकांनी उस्फुर्त आयोजन करत अनोखी भगवा रॅली पार पडली