कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- आज अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी (२१ जानेवारी) माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील श्रीराम मंदिरात स्वत:च्या हाताने फुलांची आकर्षक सजावट केली. विविधरंगी फुलांची ही आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांच्या आवाहनानुसार माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी रामभक्त म्हणून शुक्रवारी कोपरगाव येथील श्रीराम मंदिरात मनोभावे स्वच्छता सेवा केली. त्यांनी स्वत: हातात झाडू, मॉप घेऊन श्रीराम मंदिराचा सभामंडप, परिसर स्वच्छ केला. त्यापाठोपाठ आज रविवारी त्यांनी श्रीराम मंदिरात जाऊन स्वत:च्या हाताने फुलांची आकर्षक सजावट केली. प्रारंभी त्यांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व महादेवाचे मनोभावे पूजन करून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी स्वत:च्या हाताने फुले ओवून श्रीराम मंदिराचा गाभारा, सभामंडप व परिसर आकर्षक फुलांनी सजवला. श्रीराम मंदिरात स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेली फुलांची सुंदर आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती.
भगवा मोटारसायकल रॅलीचे पुष्पवृष्टी करून स्वागत; लंगर कार्यक्रमात महाप्रसाद वाटपाची सेवाप्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात रविवारी सायंकाळी वाजतगाजत काढण्यात आलेल्या भव्य भगवा मोटारसायकल रॅलीचे स्नेहलताताई कोल्हे यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. तसेच शीख धर्माचे दहावे गुरू गुरू गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारा श्री गुरू सिंग, कोपरगावच्या वतीने तहसील कार्यालयाशेजारील प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्नेहलताताई कोल्हे यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी त्यांनी शीख समाजबांधवांना गुरू गोविंद सिंग जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आणि लंगर कार्यक्रमात भाविकांना महाप्रसाद वाटपाची सेवा करून महाप्रसादाचा लाभ घेतला.