श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ) :- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “करिअर कट्टा” या उपक्रमाअंतर्गत अहमदनगर जिल्हा प्राचार्य प्रवर्तक म्हणून श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी यांची दि. २७ जानेवारी २०२४ रोजी करिअर कट्टा चे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ.दिनानाथ पाटील यांच्या उपस्थितीत एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाच्या उपक्रमात निवड होणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. सन २०२३ मध्ये छत्रपती महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये राबविलेले विविध उपक्रम, उत्कृष्ट प्राचार्य म्हणून मिळालेले २ राज्यस्तरीय पुरस्कार आणि कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून मिळालेले २ पुरस्कार या सर्व बाबींचा विचार करून डॉ.सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयात ते १९८७ पासून प्राणीशास्त्र विषयाचे अध्यापनाचे काम करत असून त्यांना ३७ वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे. त्यांनी एन. सी.सी.प्रमुख ,अंतर्गत गुणवत्ता कक्ष आणि नॅक समन्वयक तसेच विद्यापीठीय विविध कमिटी वरती काम केलेले आहे. सन २०२१ पासून ते प्राचार्य पदावर कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३ मध्ये नॅकचा ए प्लस दर्जा कॉलेजला प्राप्त झाला आहे. महाविद्यालयात राबविलेले विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि नवीन संकल्पना जिल्ह्यात करिअर कट्टा द्वारे राबवून करिअर कट्टाची व्याप्ती आणखी वाढवणार असल्याचे प्राचार्य डॉ.सुर्यवंशी यांनी नमूद केले. महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रमात समन्वयक म्हणून प्रा.विलास सुद्रिक आणि प्रा.विजय इथापे हे मागील ३ वर्षापासून काम पहात आहेत.
या निवडीबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र (दादा) नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, सौ. अनुराधाताई नागवडे, संस्थेचे सेक्रेटरी बापू तात्या नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.




