कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कर वसुलीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनियमितता दाखवली.ग्रामपंचायतमध्ये आर्थिक भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच चौकशीकामी गटविकास अधिकारी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी काल सोमवारी राहुरी पंचायत समितीच्या दारात उपोषण केले.
कोल्हार खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टी, इतर कर वसुली, जन्म मृत्यू विवाह नोंदणी कामी जमा केलेली करवसुली व अशा अनेक प्रकारच्या वसुलीमध्ये मोठी अनियमितता असून ग्रामपंचायतच्या सरकारी दफतरी मूळ दस्तऐवजांवर खाडाखोड करणे किंवा नक्कल पावत्यांवर खोट्या तारखा लिहून दस्तऐवजवर अफरातफर करणे अशा अनेक प्रकारचे गैरव्यवहार झालेले असताना सदर प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यासंबंधी चौकशी करण्याचे ठरले. मात्र याकामी चालढकल केली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. म्हणून अखेरीस ग्रामस्थांनी राहुरी पंचायत समितीच्या दारात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.
यावेळी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. ढवळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या चर्चा केली. प्राप्त अहवालानुसार ग्रामपंचायत कर्मचारी हे दोषी दिसत असून या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार हे स्थानिक ग्रामपंचायतला असून या प्रकरणात दोषी असलेल्या ग्रामसेवकांना कायदेशीर नोटीस देऊन उत्तर मागवू असे उत्तर देऊन वेळकाढू धोरण अवलंबिले.
उपोषणाला बसलेल्या चेतन शिरसाठ, सुरेश शिरसाठ, बबन शिरसाठ, महिपती शिरसाठ, श्रीमंत लोंढे, धनंजय शिरसाठ, अल्फोन्स भोसले यांची यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय शिरसाठ यांनी भेट घेतली.