कर्जत(जनता आवाज वृत्तसेवा):- कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी कर्जत शहरालगत नव्याने ‘दिनकर’ या निवासस्थान आणि कार्यालय बांधले असून उद्या (13 जून) या नूतन इमारतीचा आणि कार्यालयाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे.
विरोधकांच्या टीकेला रोहित पवार यांचे रोखठोक उत्तर, कर्जत मध्ये बांधला आलिशान बंगला
तत्कालीन भाजपचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे त्यावेळचे पालकमंत्री असलेले राम शिंदे यांचा लक्षवेधी पराभव केला. मुळात रोहित पवार यांनी निवडणूक लढवण्या अगोदरच ते सर्वेसर्वा असलेल्या बारामती ऍग्रोच्या माध्यमातून सुरुवातीला आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून आमदार झाल्यानंतर मतदारसंघाशी नाळ जोडली होती.
दरम्यान रोहित पवारांवर वेळोवेळी त्यांचे राजकीय विरोधक असलेले विधानपरिषद आ. राम शिंदे यांनी रोहित पवार ‘बाहेर’चे असल्याची टीका-टिपण्णी विविध मुद्यांवरून केली. नुकतेच कुकडीचे अवर्तनास पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या विरोधा मुळे उशीर झाला अशा वेळी बारामतीचे असलेले आ. रोहित पवार गप्प का असा सवाल आ. शिंदेंनी करत ते पुणे जिल्ह्यातील बारामतीकर असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच काल (11 जून) रोजी कर्जत बाजार समिती सभापतीचा निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर कुकडीचे चार आवर्तने आपण दिल्याने शेतकरी मतदार आपल्या पाठीशी असल्याचे सांगत ‘आपला तो आपलाच असतो हे जनतेला कळायला लागले आहे’ अशी प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा आ पवारांवर ते मतदारसंघाच्या बाहेरचे असल्याचे दर्शवणाचा प्रयत्न केला.
दरम्यान आता असे असले तरी आ. रोहित पवार यांनी कर्जत मध्ये निवासस्थान आणि कार्यालय बांधून आपण आता कर्जतकर होणार असल्याचे स्पष्ट करत होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने आ. पवार यांनी याची माहिती सोशल माध्यमातून देतानाच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, नगर दक्षिणेचे भाजप खासदार सुजय विखे आणि राजकीय विरोधक आ. राम शिंदे यांना जाहीरपणे निवास्थान पूजेच्या कार्यक्रमास तिर्थप्रासादास येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे हे विशेष.
काही दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामतीचे पार्सल परत पाठवून द्या, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी पुढील महिन्यात नवीन घराच्या पुजेला विखे पाटलांना निमंत्रण देणार असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यानुसार आता त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
दुसरीकडे खा.सुजय विखे आणि आ. रोहित पवार यांची जवळीक वाढत असल्याचे बोलले जात असून जामखेड बाजार समितीत पक्षाला विखे पिता-पुत्रांकडून मदत होत नसल्याची जाहीर नाराजी आ. राम शिंदेंनी व्यक्त केली होती. यात खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालून विखे-शिंदे यांच्यात समेट घडवून आणावा लागला होता.
दिनकर नाव दिलेल्या या वास्तूच्या पूजेला आ. रोहित पवार यांनी राजकीय विरोधकांना दिलेले जाहीर निमंत्रण:
कर्जतमध्ये बांधलेलं ‘दिनकर’ हे निवासस्थान आणि ऑफिस या वास्तूची उद्या (मंगळवार दि. १३ जून) सकाळी ९ ते दुपारी १२ यादरम्यान पूजा ठेवण्यात आली आहे. या पूजेच्या निमित्ताने आपण तिर्थप्रसादासाठी उपस्थित राहून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी व्हावं, ही नम्र विनंती