नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर या वर्षी निमगाव वाघा येथे दिनांक ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना समाजसेवेसाठी व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रसेवेसाठी नवीन युवा पिढी घडवण्याचं काम या मोहिमेमधून होत आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे सर यांनी केले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे विश्वस्त मा. मुकेश दादा मुळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना ग्राम स्वच्छतेचे महत्व समजून सांगितले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या शिबिरामधून तंत्रज्ञानाशी निगडित विविध गोष्टी गावाच्या विकासासाठी कशा अमलात आणता येतील, याविषयी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यावी, असे मत कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे पी एम आर ओ (पुणे) चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेंद्र शिंदे साहेब यांनी व्यक्त केले. येत्या सात दिवसांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी निमगाव वाघा या गावांमध्ये स्वच्छता अभियान, श्रमदान, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, आरोग्य विषयक जनजागृती असे विविध उपक्रम हाती घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गिरीश पाटील यांनी दिली. महाविद्यालयातील प्रा. अमेय कुलकर्णी, प्रा. मोहनेश मांढरे, प्रा. अक्षय देखणे, प्रा. टी. पी. धंगेकर आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचा विद्यार्थी ओंकार कांडेकर याने केले तर आभार प्रदर्शन प्रा. अक्षय देखणे यांनी केले.
संस्था स्तरावरून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज चे अध्यक्ष. मा.श्री.रा.ह.दरे साहेब, सचिव मा.श्री. जी.डी.खानदेशे साहेब, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉक्टर विवेक भापकर साहेब, विश्वस्त ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम तसेच संस्था सदस्य-पदाधिकारी यांनी ७ दिवसीय विशेष हिवाळी शिबिरमधून विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या समाजसेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.