अहमदनगर दि.३( जनता आवाज वृत्तसेवा ):- आजचे विदयार्थी हे उद्याच्या उज्ज्वल देशाचे भविष्य आहेत. कौशल्यावर्धित शिक्षणामध्ये उद्याचे भविष्य असुन उद्याच्या विकसित भारतामध्ये कौशल्य विकासाद्वारे नवी पिढी निर्माणाचा संकल्प करण्याचे आवाहन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले
जाधव लॉन्स येथे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व जिल्हा गणित विज्ञान अध्यापक संघ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन सन २०२३-२४ पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, नगरसेवक सुभाष लोंढेआदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षापासून जिल्ह्यात अशा प्रकारचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधक व चिकित्सक वृत्तीला वाव मिळून आत्मविश्वासाने या विद्यार्थ्यांनी नवनवीन उपकरणे सादर केली आहेत. परंतु आजच्या आधुनिकतेच्या युगात नवीन बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग या उपकरण निर्मितीसाठी व्हावा,अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपला प्राधान्य दिले आहे. देशभरातील होतकरू तरुणांना या माध्यमातून संधी देण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अनेक होतकरू तरुणांनी या स्टार्टअपद्वारे उत्तम अशी कामगिरी करून दाखवली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उद्याचे भविष्य हे कौशल्यावर्धित शिक्षणामध्येच आहे. त्यामुळे उद्याची विकसित पिढी घडवण्यासाठी शालेय अवस्थेमध्येच विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमधून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याची सुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील गुणवंत विदयार्थी व शिक्षकांची निवड करण्यात यावी. या शिक्षक व विद्यार्थ्यांना देश व परदेशातील विज्ञान व संशोधन संस्थेमध्ये पाठविण्याचा मानस व्यक्त करत यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल. तसेच ज्ञान संपादन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणाऱ्या सहलींचे आयोजन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.
या प्रदर्शनात उत्कृष्ट उपकरणे सादर केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवही करण्यात आला. तसेच खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या वतीने प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर लॅपटॉप बॅग भेट देण्यात आली.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.