पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-
राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान तसेच लवणस्तंभांमुळे जगभरातील पर्यटक तसेच अभ्यासकांना भुरळ घालणाऱ्या निसर्गरम्य वडगांव दर्या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी ९ कोटी १४ लाख ४८ हजार रूपयांच्या निधीसाठी तत्वतः मंजुरी मिळाल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली.
निसर्गरम्य तसेच भौगोलिक महत्व असलेल्या या परिसराचा विकास करण्यासाठी विश्वनाथ कोरडे यांनी पुढाकार घेऊन खा. डॉ. सुजय विखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या निधीस तत्वतः मंजुरी मिळाल्याचे कोरडे म्हणाले. या निधी मिळविण्यासाठी उपवनसंरक्षक माने यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही कोरडे यांनी आवर्जुन नमुद केले.
वडगांव दर्या परिसराच्या भौगोलीक रचेनेचा विचार करून पर्यटकांच्या गरजा भागविण्यासाठी निधीची आवष्यकता होती. हा निधी मंजुर झाल्यानंतर छोटे मोठे उद्योग वाढीस लागून विविध वन औषधींच्या निर्मितीसही चालना मिळणार आहे. त्यासाठी गेल्या दिड वर्षांपासून या प्रस्तावासाठी कोरडे हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. सुमारे तीन वर्षात मार्गी लागणाऱ्या या कामानंतर या परीसरात खऱ्या अर्थाने पर्यटनास चालना मिळणार आहे.
वन विभागाकडील पाठपुराव्यास यश
या परिसरातील जमीनीचा हक्क वन विभागाकडे येत असल्याने येणाऱ्या तांत्रीक अडचणींमुळे हा भाग अनेक दशकांपासून विकासापासून वंचित होता. वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विश्वनाथ कोरडे (प्रदेश कार्यकारणी सदस्य, भाजपा)