बेलापूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- बेलापूर परिसरात बिबट्यांचा राजरोसपणे वावर होत आहे. अनेकांना बिबटे आढळले आहेत. या बिबट्यांनी कुञे, मोर यावर ताव मारला आहे. बिबट्यांच्या राजरोस वावरण्याने बेलापूर शिवारातील वाड्या-वस्त्यांवर दहशत व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वनविभागाच्या दुर्लक्षाबद्दल चीड व्यक्त केली जात आहे.
बेलापूर शिवारातील गोखलेवाडी, कु-हे वस्ती, दिघी रोड व टिळकनगर परिसरात बिबट्याचा वावर आहे. अनेकांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. या बिबट्याने वस्त्यांवरील कुञे, शेळ्या तसेच मोर फस्त केले आहेत. एका ठिकाणी तर चक्क नारळाच्या झाडावरील मोरावर बिबट्याने ताव मारला.
बिबट्याच्या या प्रकारामुळे बेलापूर शिवारातील वाड्या-वस्त्यांवर दहशत पसरली आहे. राञराञ जागून थाळ्या वाजविणे, फटाके फोडणे असे प्रकार करावे लागत आहेत. या परिसरातील अनेक मुले, मुली सायकलवर अथवा पायी शाळेला जातात. त्यांचेबाबत पालकांत चिंतेचे वातावरण आहे. या मुलांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागते. यासंदर्भात वन विभागाकडून काहीही कारवाई केली जात नाही. वन विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील नागरीक संताप व्यक्त करीत आहेत. वन विभागाने तातडीने याप्रश्नी लक्ष द्यावे आणि बिबट्याच्या दहशतीतून नागरीकांना मुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे.