कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहाता तालुक्यातील तिसगाव प्रवरा येथे एका ऊसाच्या शेतामध्ये नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला. फुफ्फुस पूर्ण खराब झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
राहाता तालुक्यातील तिसगाव प्रवरा येथे तिसगाव सोसायटीचे चेअरमन प्रकाश भगवंत कडू यांच्या ऊसाच्या शेताजवळ बांधावर काल शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बिबट्या मृत अवस्थेत आढळला. घटनेची माहिती कोपरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयास देण्यात आली. त्यानंतर दुपारी लोणी विभागाचे वनरक्षक प्रतीक गजेवार यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ खपके यांनी घटनास्थळी येऊन मृत अवस्थेतील बिबट्याचे शवविच्छेदन केले. सदर नर जातीचा बिबट्या अडीच ते तीन वर्षाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन होऊन फुफ्फुस पूर्ण खराब झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी दैनिक जनता आवाजशी बोलताना सांगितले.
तिसगाव प्रवरा येथे श्री. कडू यांच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याची वार्ता कळताच गावातून बघ्यांची मोठी गर्दी काल दुपारपर्यंत घटनास्थळी होती.




