शिर्डी दि. १०( जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्ह्यात २०२२ ते २०२३ या कालावधीत झालेली अतिवृष्टी, सततचा पाऊस, गारपीठ आणि अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी ६ लाख ५६ हजार ९५९ शेतक-यांना सुमारे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे मदतरुपी अनुदान मंजुर झाले असून मंजूर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे २ लाख ५५ हजार ६८ शेतक-यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. महसूल आणि कृषि विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यातून या शेतक-यांना २९१ कोटी रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. याच दरम्यान अतिवृष्टीच्या निकषा बाहेरील सततच्या पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून, २ लाख ९२ हजार ७५० शेतक-यांना विशेष बाब म्हणून २४१ कोटी रुपयांची मदत शासनाने दिली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
मार्च २०२३ मध्ये अवेळी पावसामुळे जिल्ह्यात ११ हजार ७९३ शेतक-यांना शेती पिकांचे नुकसान सहन करावे लागले. या शेतक-यांना १० कोटी ४१ लाख ४७ हजार ५८३ शेतक-यांना एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसातील मदत म्हणून ४६ कोटी ९३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ऑक्टोंबर, नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई देखील महायुती सरकारने शेतक-यांना दिली असून, जिल्ह्यातील २७ हजार ५३० शेतक-यांना १९ कोटी ५५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या वादळी वारे आणि गारपीटीतील शेती पिकांच्या नुकसानी करीता २१ हजार ६८३ शेतक-यांना २८ कोटी ३७ लाख, जुन २०२३ मध्ये वादळी वारे व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानी करीता ४६० शेतक-यांना ४५ लाख आणि सप्टेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिक व शेतजमीनींच्या नुकसानीपोटी ९२ शेतक-यांना २ लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असल्याकडे लक्ष वेधून, आत्तापर्यंत नैसर्गिक नुकसान झालेल्या शेतक-यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभे असून, जिल्ह्याला आत्तापर्यंत ६३७ कोटी ७८ लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली असून, पोर्टलवर परिपुर्ण माहीती असलेल्या शेतक-यांना सदर मदत थेट त्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.




