कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजना समजून घ्याव्यात आणि या योजना समाजातील तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली.
कोल्हार येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना मूल्यशिक्षण उपक्रमांतर्गत ” व्यक्तिमत्व विकास शिबिर ” आयोजित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ. विखे पा. यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे हे होते. याप्रसंगी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विश्वस्त संभाजीराव देवकर, विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, व्याख्याते डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. दत्ता पाटील, डॉ. जयश्री सिनगर, डॉ. राजेंद्र सलालकर आदि उपस्थित होते.
सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, संत गाडगेबाबा यांच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियानासाठी पुरस्कार दिले जातात. माणसाने या संतांप्रमाणे आयुष्यात समाजासाठी जगण्याचा आदर्श घ्यावा. गावात दारूबंदी, स्वच्छता अभियान तसेच घरपट्टी – पाणीपट्टी भरण्याकरिता जनजागृती करण्यासाठी तसेच घरोघरी शौचालय बांधण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता युवकांनी पुढे आले पाहिजे.
डॉ. भास्करराव खर्डे म्हणाले, व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या माध्यमातून आपल्याला दर्जेदार व्याख्याने ऐकायला मिळतात हे भाग्य आहे. या व्याख्यानांचा विद्यार्थ्यांना जीवनात उपयोग होणार आहे. वयाच्या योग्य टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन मिळते हे महत्वाचे आहे.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी मानले. कार्यक्रमाचे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण तुपे व प्रा. संगीता धिमते हे होते.
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी युवकांची गरज – सौ. विखे पा.
गावपातळीवर वेगवेगळी विकासकामे होत असतात. त्या कामावरील सर्वच ठेकेदार भ्रष्टाचारी नसतात. गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य तसेच युवकांनी या प्रत्येक कामावर लक्ष ठेवले पाहिजे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी युवकांची नितांत गरज असल्याचे सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितले.




