शिर्डी : (जनता आवाज वृत्तसेवा):-संवाद दौऱ्याच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन दिवस. शिर्डी लोकसभा मतदार संघ पिंजून – काढणार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते सहाही विधानसभा मतदारसंघात मेळावे घेणार आहेत. खासदार – सदाशिव लोखंडे यांच्या पराभवासाठी ठाकरे हे रणनिती आखत लोकसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांच्याकडे ठाकरे यांच्या दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.१३) ठाकरे यांचे छत्रपती संभाजीनगर येथून नेवासा तालुक्यात आगमन होणार आहे. सोनईचा मेळावा अटोपल्यानंतर ते राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील
कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तेथून ते श्रीरामपूरच्या भगतसिंह चौकातील जाहीर सभेस संबोधित करणार आहेत.
श्रीरामपूरहून ते बाभळेश्वर मार्गे राहता येथे पोहचणार असून तेथेही जाहीर सभेस मार्गदर्शन करणार आहेत. शिर्डी येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.१४) सकाळी कोपरगाव येथील आंबेडकर मैदानातील जाहीर सभेस उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. कोपरगावहून संगमनेर येथील बस स्थानकाशेजारील जाहीर सभेला संबोधित करून ते अकोलेकडे जाणार आहेत. तेथील बाजार तळावर ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. तेथून संगमनेर मार्गे परत शिर्डीला येऊन खाजगी विमानाने ते मुंबईला परत जाणार आहेत.




