सात्रळ, दि.१२( जनता आवाज वृत्तसेवा):- साञळ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजित केले गेले. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डेलनेट चे महाराष्ट्र व गोवा विभागाचे डेलनेट नेटवर्क असिस्टंट प्रा. रोहिदास राठोड हे होते.
डेलनेट मार्फत पुरवीत असलेल्या विविध सेवा सुविधा व ग्रंथ देवघेव बाबतची उत्कृष्ट माहिती प्रा. राठोड यांनी महाविद्यालयातील शिक्षक वर्ग, अभ्यासक, संशोधक, ग्रंथालय वर्ग, विद्यार्थी व ग्रंथालय वाचकांना दिली.
वाचकांना कुठलेही संदर्भसेवा व ग्रंथ लेख तात्काळ हवे असल्यास ते पुरवण्याचे काम डेलनेट करते. ग्रंथ साहित्याचं भंडार म्हणजे डेलनेट आणि हे इ-साहित्य व वाचन साहित्य वाचकांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी देण्याचं काम करत आहे असे राठोड यांनी आपल्या पहिल्या सत्रात सांगितले. आज डेलनेटनी ग्रंथ भंडाराचे दरवाजे वाचकांसाठी उघडले आहेत. वाचक कुठेही, कधीही आणि केव्हाही माहिती मिळवत आहे तसेच वाचन संस्कृती जोपासत आहे. वाचक व वाचन हे स्मार्ट होत आहे. ग्रंथ, ग्रंथालय, ग्रंथपाल व ग्रंथवाचक हे वाचन संस्कृतीचे मूळ घटक आहेत आणि या घटकांना घेऊन डेलनेट काम करत आहेत असे राठोड यांनी दुसऱ्या सत्रात सांगितले. डेलनेट हे ग्रंथालयाशी जोडलेले जाळे नसून अनेक वाचकांशी जोडलेले नेटवर्क आहे. याप्रसंगी त्यांनी डेलनेट पुरवीत असलेल्या विविध सेवा सुविधांचे ऑनलाईन प्रात्यक्षिक दाखविले. डेलनेट म्हणजे वाचन साहित्याचा महासागर असून तो सर्वांनाच निश्चित उपयोगाचा असा स्त्रोत आहे तसेच योग्य वाचकांना, योग्य वेळी व योग्य माहिती देत आहेत असे राठोड यांनी सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे म्हणाले की, महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग राबवीत असलेले अनेक उपक्रम स्तुत्य असे उपक्रम आहेत. ग्रंथालय नेहमीच विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन केल्यामुळे वाचकांना माहिती शास्त्रातील वेगळ्या संकल्पना ज्ञात होऊन त्यांची त्या विषयाची वैचारिक पातळी वाढवण्यास मदत होते. महाविद्यालयातील सर्वच घटकांनी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयीन ई लायब्ररी पुरवीत असलेल्या सुविधांचा वापर करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय प्रमुख श्री.आदिनाथ दरंदले यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, डॉ. जयश्री सिनगर , विविध विभागांचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपक्रमास उपस्थित होते.