राहाता, दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-गोदावरी लाभक्षेत्रात डाव्या कालव्याचे रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन १५ फेब्रुवारी पासून तातडीने सुरु करण्याच्या सुचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहे.
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवर्तनाचे नियोजन यापुर्वी पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार हे दुसरे आवर्तन तातडीने सुरु करण्याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे.
लाभक्षेत्रातील शेतक-यांची मागणी आणि उन्हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले. यावर्षी पावसाचे अत्यल्प राहीलेले प्रमाण आणि धरणातील पाणी साठ्याचा विचार करुन आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. यापुर्वी रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन करण्यात आले होते. आता नियोजना नुसार डाव्या कालव्याचे आवर्तन सुरु करण्याचा निर्णय झाल्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रब्बी हंगामातील हे दुसरे आवर्तन सिंचन आणि बिगर सिंचनासह असून, या आवर्तनामुळे रब्बी पिकांसह फळबाग उत्पादक शेतक-यांना या आवर्तनाचा मोठा लाभ घेता येणार आहे. उन्हाची वाढती तिव्रता लक्षात घेवून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता जलसंपदा विभागाच्या आधिका-यांनी घ्यावी, तसेच शेतक-यांनीही पाण्याचा योग्य विनीयोग करावा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे