श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – चांगला माणूस घडविणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणीच दुसऱ्याचा गुलाम होतो. तेव्हा जीवनात शिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एस. आर. यादव यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती, श्रीरामपूर व वकील संघ श्रीरामपूर यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.१६) न्यायाधीश एस.आर.यादव यांचे अध्यक्षतेखाली तसेच अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शखाली अशोक कारखाना कार्यस्थळावर असंघटीत ऊस तोडणी कामगारांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश व्ही.बी.कांबळे, कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालक कोंडीराम उंडे, प्रफुल्ल दांगट, कार्यकारी संचालक संतोष देवकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, दीपक मेढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिवाणी न्यायाधीश आर.बी.गिरी यांनी ऊस तोडणी मजुरांना आपल्या मुलांना शिक्षण देऊन स्वावलंबी करावे, शासन आपल्यासाठी विविध योजना राबवित आहे त्याचा आपण आवश्य लाभ घ्यावा. आपल्यावर होणारा अन्याय सहन न करता त्यावर आवाज उठविला पाहिजे. त्यासाठी आपण संघटित असले पाहिजे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही देशात ५१ टक्के असंघटित कामगारांची संख्या आहे, ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले.
सह दिवाणी न्यायाधीश एन.के.खराडे यांनी मार्गदर्शन करताना संघटित कामगार व असंघटित कामगार याविषयी विवेचन केले. ऊसतोडणी मजुरांनी आपण ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होत असल्याने शासकीय यंत्रणेकडे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. आज शासकीय यंत्रणा आपल्या दारात आली आहे. त्याचा आपण लाभ घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. तर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड्.यु.डी. लटमाळे यांनी केले तर वकील संघाचे अध्यक्ष ॲड्.व्ही.एन.ताके यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ॲड्.ऋषिकेश बोर्डे यांनी केले.
यावेळी बाळासाहेब दांगट, कारखान्याचे कार्यलक्षी संचालक गीताराम खरात, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, ॲड्.गणेश सिनारे, प्रदीप शिंदे, अभिषेक लबडे, संकेत लासुरे, बाबासाहेब तांबे, संजय मोरगे आदींसह ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.