लोणी, दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):-विकसीत भारताच्या संकल्पनेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जोड आहे. त्यांच्या गुणांचे अनुकरण करुन, जयंती सोहळे साजरे झाले पाहीजे असे मत महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध विकास व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती दिनाच्या निमित्ताने प्रवरा उद्योग समुह आणि लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेले कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, विनायक देशमुख यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. प्रवरा उद्योग समुहातील संस्थांच्या विविध पथकांनी छत्रपतींना मानवंदना दिली. शिवगर्जना करीत उपस्थितांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. लोणी खुर्द येथे मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शिवरायांची महाआरती करण्यात आली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना तसेच प्रवरानगर येथेही शिव जयंतीचे कार्यक्रम संपन्न झाले.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ देशासाठी नाही तर जगासाठी आदर्शवत असे व्यक्तिमत्व होते. आठरा पगड जाती जमातींचे मावळे एकत्रित करुन, त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. जातीपातीच्या भिंतींच्या पलिकडे जावून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. तोच विचार घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज विकसीत भारताची संकल्पना दृष्टीपथात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा जनतेसाठी होणारा प्रत्येक निर्णय हा शिवाजी महाराजांच्या विचारांशी सुसंगत असल्याचे त्यांनी सांगितले.
या देशात अनेक वर्षे राजेशाही होती, अनेक राजे रजवाडे होवून गेले पण सर्वांचाच इतिहास अजरामर होवू शकला नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास मात्र सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आज आपण शिवाजी महाराजांचा जयघोष करुन, जयंती सोहळे साजरे करतो. परंतू हे जयंती सोहळे त्यांच्या गुणांचे अनुकरण करुन साजरे झाले तरच या जयंती दिनाचे महत्व आधोरेखित होईल. आज राज्यात असलेले गडकिल्ले हे महाराजांच्या इतिहासाची अस्मिता आहे. त्याचे पावित्र्य राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन पथकामध्ये सहभागी झालेल्या महिला, विद्यार्थ्यांचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही मंत्री विखे पाटील यांनी अभिवादन केले. या पुतळ्याच्या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या पुतळ्याच्या सुशोभिकरणास निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. या कार्यक्रमास शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.