लोणी दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा ):-अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटूंबाना आता अन्नधान्या बरोबरच साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोउद्योग विभागाने घेतलेल्या निर्णयाचा तालुक्यातील ५हजार ५९७ कुटूंबियांना लाभ होणार असून, होळीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारची ही भेट ठरणार आहे.तालुक्यातील साडी वाटपाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कॅप्टीव्ह योजने अंतर्गत साडी वाटपाचा उपक्रम महायुती सरकारने सुरू केला आहे. सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोणी बुद्रूक येथे करण्यात आला. याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात महिलांना साडीचे वितरण करण्यात आले. शासनाच्या वतीने तालुक्यातील महिलांना आता रेशन दुकानामधून साडीची भेट उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
याप्रसंगी सरपंच श्रीमती कल्पना मैड,सौ.सुचित्रा विखे, सौ.आशाताई कडलग, गणेश विखे, माजी सिनेट सदस्य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, नानासाहेब म्हस्के, अशोक धावणे,चांगदेव विखे, भाऊसाहेब विखे, नवनित साबळे, रविंद्र धावणे, रामभाऊ विखे, राम पाटीलबा विखे, भाऊसाहेब धावणे बाळासाहेब कडगल, पंकज कडलग, नवनाथ विखे, प्रविण विखे, दिलीप काका विखे यांच्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ.विखे पाटील म्हणाल्या की, राज्य शासणाच्या माध्यमातुन सामान्य नागरीकांसाठी सुरु असलेल्या योजनांचा लाभ होत आहे. आज राज्य शासनाने विशेष आधिवेशन घेवून राज्यातील मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदन करुन आभार मानले.
महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून पोस्टाच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित महीलांना केले.
राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटूंबांना यापुर्वी सरकारने आनंदाचा शिधा या माध्यमातून मोफत धान्य उपलब्ध करुन दिले आहे. वर्षभरातील चैत्रपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती व दिवाळी सणानिमित्त तसेच आता नुकत्याच संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १०० रुपयात आनंदाचा शिधा उपलब्ध करुन दिला आहे. या शिधापत्रिका धारकांना आता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने एक साडी दरवर्षी भेट देण्याचा निर्णय केला असून, त्याची अंमलबजावणी सुरु केली.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटूंबाला साडीची उपलब्धता होणार असून, साडीची ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजे २०२८ पर्यंत राबविली जाणार आहे.राहाता तालुक्यातील ५हजार ५९७ कुटूंबियांना या योजनेचा लाभ होणार आहे.