शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):-शेवगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जो काही प्रयत्न करावा लागेल त्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल. शेवगाव शहराचा बायपास हा लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच शेवगाव शहरातील पाणी प्रश्न यावर देखील लवकरच मार्ग निघणार आहे असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले
शेवगाव शहर येथे ज्ञानेश्वरी लोकसंचित केंद्र, उमेद व शेवगाव तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्याचे वाटप आज खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वयंरोजगार विक्री केंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजारे बँक व बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तुषार वैद्य, बापूसो भोसले, गुरुनाथ माळवे, शितल केदार, बापू धनावडे, गणेश कराड, बाळासो कोलगे, गणेश कोरडे, टिंकू बंब, सागर फटके, दिगंबर कायवटे, अण्णा ढोके, विष्णू धनगर, अमोल सागडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, अधिकारी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी महिलांना सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. याच अनुषंगाने महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला भगिनींना आर्थिक पाठबळ देऊन विविध साधनांची उपलब्धता करून देण्यात येत आहे. नक्कीच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळेल असे मत यावेळी सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
शेवगाव शहराचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेवगाव शहरातील पाणीपुरवठा. सदरील प्रश्न महायुतीचे सरकार आल्यापासून आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून सोडविण्यात येत असून लवकरच पाणीपुरवठा योजनेतून शेवगाव शहरासाठी सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल. पाण्याअभावी शहरामध्ये १४ ते १५ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. या अनुषंगाने लवकरच पाणीटंचाई संदर्भात येत्या दोन ते तीन दिवसात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक होणार आहे. विशेष म्हणजे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सध्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागांमध्ये टँकरने पाणी पोहोचवण्याची सोय देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नका आणि शक्य होईल तितक्या लवकर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून प्रश्न सोडविला जाईल असे मत त्यांनी मांडले.
मागील सरकारच्या काळामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला. परंतु महायुतीचे सरकार येताच ही योजना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून लवकरच सदरील योजना ही पूर्णत्वास येईल असेही मत त्यांनी मांडले.
तसेच शेवगावचा चर्चेत असलेला बायपास देखील लवकरच पूर्ण होईल. सध्या डी पी आर साठी ६५ लाख रुपये मंजूर झाले असून पुढील काम देखील लवकरच मार्गी लागून बायपासचा प्रश्न सुटेल आणि नगर शहरातील वाहतुकीचा मोठा त्रास हा कमी होईल असे देखील सुजय विखे यांनी स्पष्ट केले.