संगमनेर, दि.२१,( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांच्या वाटचालीत देशातील प्रत्येक समाज घटकाचा विचार करुन योजनांची अंमलबजावणी केली. पंतप्रधानांच्या वयोश्री योजनेमुळे जेष्ठ नागरीकांना मोठा आधार मिळाला असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील १ हजार ८०० जेष्ठ नागरीकांना आणि ५६३ दिव्यांग व्यक्तिंना केंद्र सरकारच्या योजनेतून मंजुर झालेल्या साधन साहित्यांचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह महायुती मधील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. तालुक्यातील २९ शाळांना मंजुर झालेल्या डिजीटल बोर्डाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, तालुक्यातील सुमारे १५ हजार जेष्ठ नागरीकांना आत्तापर्यंत राष्ट्रीय वयोश्री योजनेतून साधन साहित्यांचे वाटप झाले आहे. नगर जिल्ह्यातील ४५ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याने नगर जिल्हा हा देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
मागील दहा वर्षात देशातील प्रत्येक नागरीकाला पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या योजनेचा लाभ मिळत आहे. देशाचा विकास साध्य करताना सामान्य माणूस विकास प्रक्रीयेत जोडण्याचे मोठे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. कोव्हीड संकटात राज्यात आघाडी सरकार सत्तेत होते. पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एकदाही मंत्रालयात फिरकले नाहीत. सरकार मधील मंत्री पर्यटनाला कुठे निघुन गेले होते हे त्यांनाच माहीत अशी टिका करुन, कोव्हीड सारख्या संकटात या देशातील जनतेच्या पाठीशी प्रधानमंत्री मोदी भक्कमपणे उभे होते. त्यामुळेच हा देश या मोठ्या संकटातून सावरला गेला. या संकटात सुरु केलेली मोफत धान्याची योजना आजही सुरु असल्याचे त्यांनी नमुद केले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना आणि जलजीवनचे मोठे काम सुरु असून, ग्रामीण भागात प्रत्येक घराला नळाव्दारे पाणी देण्याचे काम केंद्र सरकारमुळे होत आहे. राज्यातील युती सरकारही मोदीच्या विकासाप्रमाणेच निर्णय घेत आहे. एक रुपयात पीकविमा योजना सुरु करुन, राज्य सरकारने शेतक-यांना दिलासा दिला. संगमनेर तालुक्यातील ४४ हजार शेतक-यांना सुमारे २८ कोटी रुपयांची अग्रीम रक्कम मिळाली आहे तर वेगवेगळ्या नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या ४४ हजार शेतक-यांच्या खात्यात २७ कोटी ४४ लाख रुपये जमा झाले असून, हे जनतेच्या मनातील सरकार आहे त्यामुळेच जनतेच्या हिताचे निर्णय होत असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाचा निर्णय हा सुध्दा एैतिहासिक ठरला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले यांचीही भाषण झाली. या कार्यक्रमात योजतील लाभार्थ्यांसह महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.