राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहुरी पोलिस प्रशासनाने महिला, मुलींच्या संरक्षणार्थ आरोपींची धरपकड मोहिम सुरूच ठेवताना नुकतेच अपहरण झालेल्या ३ अल्पवयीन पीडित मुलींची सुटका केली आहे. पळवून नेलेले दोन मुख्य आरोपींसह एका गुन्ह्यात मदत करणार्या आरोपीच्या आईला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पंधरवड्यात एकूण १० अल्पवयीन पीडित मुलींना आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
राहुरी हद्दीतून एका सोळा वर्षीय पीडितेचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपी अजय बाळू शिरोळे (२५) रा. डिग्रस ता. राहुरी यास अटक करण्यात आली आहे. तरुणाने पीडित अलपवयीन मुलीला हडपसर (पुणे) येथे एका भाडोत्री खोलीत डांबून ठेवले होते. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सहाय्यक फौजदार औटी, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस शिपाई नवले, पोलीस शिपाई थोरात यांनी कारवाई केली.
राहुरी पोलिस ठाणे हद्दीतीलच एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषनाद्वारे पीडितेला सांगली येथून सुटका केली. यामध्ये आरोजी सुनिल सहदेव सूर्यवंशी रा. ब्राम्हणी ता. राहुरी यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार चंद्रकांत बर्हाटे व पोलिस हवालदार अजिनाथ पाखरे यांनी पीडितेची आरोपीच्या ताब्यातून सांगली येथून सुटका केली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलिस हवालदार चंद्रकांत बोर्हाटे, वाल्मिक पारधी, अजिनाथ पालवे, सुनिल निकम, सतीष कुर्हाडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
राहुरी खुर्द परिसरातूनही १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा आईने दाखल केला होता. याप्रकरणातही राहुरी पोलिस प्रशासनाने तपसाला गती देत तांत्रिक विश्लेषनाद्वारे पीडित मुलीचा शोध घेतला. संबंधित पीडितेला मुंबई येथे डांबून ठेवल्याचे समजले. मुलीची सोडवणूक करीत राहुरी पोलिसांनी तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे. तसेच एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यासाठी सहाय्य करणारी आरोपीची आई नामे शोभा संपत लावरे वय ४८ वर्षे हिस अटक करण्यात आली. न्यायालयाने २२ तारखेपर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे. तपासा दरम्यान अटक आईच्या सहायाने आरोपी संदीप संपत लावरे व पिडीतेचा शोध घेत आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात लेखनिक हवालदार साळवे, कार्यालयीन लेखनिक पाखरे, अमोल गायकवाड , सम्राट गायकवाड,अशोक शिंदे, रोहकले ,राहुल यादव, सुरज गायकवाड, नदीम शेख, प्रवीण बागुल यांनी तांत्रिक विश्लेषण आधारे केलेली आहे.
महिला अत्याचाराचे प्रकरणाबाबत कठोर कारवाई
राहुरी पोलिस प्रशासनाने महिला, तरूणी, अल्पवयीन मुलींबाबत घडणार्या प्रकरणांबाबत अत्यंत कठोर भूमिका घेत आरोपींना वठणीवर आणण्याचे कार्य केले आहे. पोलिस ठाण्यात चकरा मारूनही मुली आई वडिलांना मिळत नव्हत्या. परंतू राहुरी पोलिस प्रशासनाने आई वडिलांच्या हाकेला धाव घेत पंधरा दिवसातच १० अल्पवयीन मुलींची सुटका केलेली आहे. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरातही टारगटांचा बंदोबस्त केल्याचे दिसत आहे.