spot_img
spot_img

कोल्हार येथे बाजारात फत्याबादची वृद्ध महिला मृत्यूमुखी

कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूर येथे आठवडे बाजारामध्ये  बाजार करत असलेली फत्याबाद येथील ७८ वर्षीय वयोवृद्ध महिला काळाच्या पडद्याआड गेली. कुणाला काही समजण्याच्या आत ही घटना घडली. मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी कदाचित उष्माघात किंबहुना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असावे असा अंदाज आहे. अचानक घडलेला हा प्रकार पाहून बाजारातील गर्दी काही क्षण अवाक झाली.
विठाबाई कचरू शिंदे ( वय – ७८ ), राहणार फत्याबाद, ता. श्रीरामपूर असे मृत पावलेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ महिलेस रुग्णवाहिकेतून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यापूर्वीच महिलेची प्राणज्योत मालवली असल्याचे समजते.
दर शुक्रवारी कोल्हार भगवतीपूर  येथे आठवडेबाजार भरतो. प्रवरा परीसरातील आजूबाजूच्या असंख्य गावातील लोक येथे बाजार करण्यासाठी येत असतात. काल शुक्रवार दि. २ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बाजार करीत असलेली ही महिला अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. वयोवृद्ध महिला चक्कर येऊन पडल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. कदाचित फीट आली असेल म्हणून काहींनी पारंपारिक प्रथमोपचार करून पाहिले. थोड्या वेळाने महिलेचा नातू तिथे आला. दरम्यान काही नागरिकांनी कोल्हार पोलिसांना खबर दिली.
कोल्हार पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे व पोलीस नाईक संभाजी कुसळकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली.  त्यामध्ये सदर वृद्ध महिला व तिचा नातू यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी महिलेस मृत असल्याचे घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!