टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- मराठा आरक्षणा बाबत राज्य सरकारने सगेसोयरे अधिसुचनेची अंमल बजावणी करावी या मागणीसाठी आज शनिवार दिनांक २४ रोजी टाकळीभान येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर बसस्थानक परिसरात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी टाकळीभानचे मंडळाधिकारी प्रशांत ओहळ यांना निवेदन देण्यात आल्यावर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या रास्ता रोकोमुळे श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर दुतर्फा वाहानांची मोठी रांग लागली होती. या रास्ता रोको आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.राज्य सरकारने येत्या दोन दिवसात सगेसोयरेअधिसुचनेचीअंमलबजावणी केली नाही, तर मराठा आरक्षण आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला असून त्यानुसार आज टाकळीभान येथे चक्काजाम रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलतांना उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, सरकारने सगेसोयरे अध्याधेश काढला पण त्याची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे विद्यमान सरकारने आपल्याला फसविले आहे. आपण कोणत्यातरी पार्टीशी व नेत्याशी संबधित आहोत पण हेच संबधित नेते आरक्षणाबाबत भांडत नाही त्यामुळे ती पार्टी व तो नेता आपल्या काही कामाचा नाही. लवकरच होणार्या लोकसभेच्या निवडणूकीत हेच नेते आपल्या दारात येणार असून त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या व जो पर्यंत सरकार सगेसोयरे अधिसुचनेची अंमल बजावणी करीत नाही तोपर्यंत मतदान होवू देवू नका असे आवाहन करून जो पर्यंत आचार संहिता लागत नाही तो पर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी खंडागळे दिला.
यावेळी प्रा. जयकर मगर, शिवाजीराव शिंदे, सुरेश कांगुणे, अनिल बोडखे, ॲड. दिपक कोकणे, राजेंद्र कोकणे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
रास्ता रोको आंदोलन शांततेत संपन्न होण्यासाठी श्रीरामपूर तालूका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.