संगमनेर दि.२५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-युवकांना रोजगार आणि बचत गटातील महीलांच्या अर्थिक उन्नती करीता कौशल्य शिक्षणाचे केंद्र सुरू करण्याची ग्वाही महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील कुरण येथे सुमारे १०कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामाचा भूमीपूजन समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यानिमिताने कुरण येथील अल्पसंख्याक समाजातील जेष्ठ आणि तरूण कार्यकर्त्यांनी केलेल्या सत्कार समारंभात मंत्री विखे पाटील बोलत होते.खा.सदाशिव लोखंडे भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले,भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जावेद जहागिरदार संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रमेश काळे हाफिज शेख भाजपाच्या अल्प संख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य रौफ शेख यांच्यासह कुरण गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी युवकांची आहे.पण आता शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येण्याची आवश्यकता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने कौशल्य शिक्षणाला प्राधान्य दिले आहे.याचा उपयोग या गावातील तरुणांना करून देण्यासाठी शासकीय तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून या गावात कौशल्य शिक्षणाचे एखादे केंद्र कसे सुरू करता येईल याचा प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.खा.लोखंडे यांनीही यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे सुचीत केले.
अल्पसंख्याक समाजातील महीलांचे बचत गट चांगले काम करीत आहे.या बचत गटांचे शिष्टमंडळ आजच भेटले असल्याचे सांगून या महीला बचत गटांना प्रशिक्षण देवून देवून त्यांच्या उत्पादित मालाच्या खरेदीची व्यवस्थाही करण्याच येईल असे विखे पाटील म्हणाले.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गंतवणूक येत आहे.अनेक उद्योग येण्यास तयार आहेत.यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचे प्रयत्न करावे लागतील.जिल्ह्यात शिर्डी नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात औद्योगिक वसाहती करीता जागा उपलब्ध करून दिली.शिर्डी येथे लवकरच काही उद्योगाचे प्रकल्प येणार असल्याने जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करून देण्याचा आपला प्रयत्न आहे.
जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी देण्याकरीता नगर येथे २८आणि २९फेब्रुवारी रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून तिनशेहून अधिक कंपन्याना निमंत्रित करण्यात आल्या आहेत.दोन दिवसातील या मेळाव्यातून युवकांच्या मुलाखती आणि नौकरीचे पत्र देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
कुरण गावाने नेहमीच विखे पाटील कुटूबियांवर प्रेम केले.खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून या गावाने राजकारणा पलिकडे जावून जपलेला ॠणानुबंध खूप महत्वाचा आहे.