नेवासा फाटा( प्रतिनिधी):लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसच्या एस.सी. विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांनाच उमेदवारी देण्याच्या आग्रही मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला ठेऊन एस.सी. विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनाच उमेदवारी देण्याची आग्रही मागणी पुढे आली आहे. यासंदर्भात जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठी तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित बनला आहे. लोकसभा निवडणूकीला नऊ महिन्यांचा कालावधी असताना शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकून जोमात कामाला सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जिल्हा अनुसूचित जाती विभागाची बैठक नेवासा फाटा येथे प्रदेश महासचिव बंटी यादव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश समन्वयक संजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. यावेळी राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब सगळगीळे यांनी लोकसभेच्या शिर्डी मतदार संघाची जागा काँग्रेसने लढविण्यासह या जागेवर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनाच उमेदवारी देण्याचा ठराव मांडला. त्यास कोपरगाव तालुकाध्यक्ष यादवराव त्रिभुवन यांनी अनुमोदन दिले. टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी एकमुखाने या ठरावास मंजुरी दिली.
याप्रसंगी बंटी यादव, संजय भोसले, राहता तालुकाध्यक्ष बाळासाहेब पगारे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ब्राह्मणे, नेवासा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, ऍड. कल्याण पिसाळ आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी अकोले तालुकाध्यक्ष सतीश वाकचौरे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अविनाश काळे, नेवासा तालुकाध्यक्ष किरण साठे, जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सचिव चंद्रशेखर कडू, परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप मोटे, महिला आघाडीच्या शोभाताई पातारे, अल्पसंख्यांक आघाडीचे अंजुमभाई पटेल, आलमभाई पिंजारी, मुसा बागवान, इलियास शेख, नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव, तसेच संजय होडगर, सतीश तऱ्हाळ, ख्रिस्ती धर्मगुरू किशोर बोर्गे, पुनतगावचे गोरक्षनाथ काळे, संजय वाघमारे, हंडीनिमगावचे ग्रामपंचायत सदस्य संकेत वाघमारे,
हंडीनिमगाव ग्रामपंचायत सरपंच भिवाजीराव आघाव ,उपसरपंच अरुण जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पिटेकर, अशोकराव पिसाळ,सतिषराव पिसाळ , अविनाश कांबळे,आदित्य चक्रनारायण,
आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीनिमित्त आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत सोशल मीडिया प्रमुख सचिन बोर्डे यांनी केले. तर युवक काँग्रेसचे वैभव वाघमारे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.



