कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- भगवतीपूर येथील कडसकर वस्ती शिवारात दत्तात्रय माधव वाघमारे यांच्या गायांच्या बंदीस्त गोठयामध्ये बिबट्याने तार कंपांऊंडच्या खालच्या बाजूने उकरून गोठयात प्रवेश करत दोन कालवडींवर हल्ला केला. यामध्ये एका कालवडीचा बिबट्याने फडशा पाडला तर दुसरी कालवड जखमी झाली.
भगवतीपूर येथील कडसकर वस्तीवर रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बिबटयाने गायांच्या गोठ्यात घुसून एका कालवडीच्या गळ्यातील नायलाॅन दावे तोडुन कालवडीला तोंडांत धरून शेजारील गिन्नी गवताच्या शेतात फरफटत नेले. गायांचा हंबरडा फोडण्याचा आवाज ऐकुन दत्तात्रय वाघमारे घरातून बाहेर आले असता बिबट्या वासराला फरफटत घेऊन जाताना त्यांना दिसला. मदतीसाठी त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. परंतु तोपर्यंत वासरू बिबट्याच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. बिबट्याच्या हल्ल्यात दुसरी कालवड देखील जखमी झाली.
गेल्या अनेक दिवसांपासून या परीसरात बिबट्याचा संचार वाढलेला असून दहशत निर्माण झाली आहे. दिवसादेखील शेतात काम करताना शेतकरी, शेतमजूर यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी या परीसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच बिबट्याने भक्ष्य केलेल्या पशुधनाबद्दल शासनाकडून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.