कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोल्हार बुद्रुक येथील चारी क्रमांक ३ च्या कडेला गट क्र.१७७ शेजारी पाटबंधारे हद्दीत अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण काढावे म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रश्नाकडे पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या लोणी येथील कार्यालयासमोर काल सोमवारी आमरण उपोषण केले.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कोल्हार बुद्रुक येथील चारी क्रमांक ३ च्या कडेला गट क्र.१७७ शेजारी पाटबंधारे हद्दीत शेतीमध्ये जाण्या – येण्याच्या रस्त्यामध्ये अतिक्रमण करण्यात आलेले आहे. याअगोदर हे अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी लोणी येथील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे. तीन वेळा उपोषण केले, त्या प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन देऊन बोळवण केली. मात्र अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. ज्यांनी येथे अतिक्रमण केलेले आहे ते लोक शेतीमध्ये ये – जा करण्याचा रस्ता अडवतात. रस्त्यावर जनावरे बांधतात, खड्डे खोदतात. शिवीगाळ करतात, खोटे गुन्हे दाखल करतात.
यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या मागणीवरून २००४ ते २००६ साली जे जुने अतिक्रमण होते ते पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी काढले असून आता नवीन अतिक्रमण झालेले आहे. ते काढण्यात यावे या मागणीसाठी येथील महिला – पुरुष शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.