संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):–ग्रामीण भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर उभ्या केलेल्या सहकाराने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शीपणे केलेल्या रचनात्मक वाटचालीमुळे संगमनेरचे हे सहकारचे मॉडेल हे भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोदगार लंडनमधील शिष्टमंडळाने काढले आहे.
युरोपमधील व लंडनमधील शिष्टमंडळाने सहकाराच्या अभ्यास दौऱ्यासाठी संगमनेरच्या विविध सहकारी संस्थांना भेटी दिल्या. यामध्ये लंडन विद्यापीठाचे डीन जिरेमी स्मिथ, वरिष्ठ पत्रकार नाथाली मायरोथ, चैतन्य मार्कपवार, हे होते त्यांचे समवेत विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ सुजित खिलारी, संभाजी वाकचौरे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.
यावेळी या शिष्टमंडळाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, राजहंस ॲक्वा ,अमृतवाहिनी बँक ,शेतकी संघ यांसह विविध शैक्षणिक संस्थांना ही भेटी दिल्या.
याप्रसंगी प्रोफेसर जेरेमी स्मिथ म्हणाले की, भारतातील ग्रामीण भागात सहकार चळवळीतून मोठे आर्थिक परिवर्तन झाले आहे. आणि याचे मोठे उदाहरण हे संगमनेर तालुका आहे. सहकारामुळे अगदी लहान लहान व्यक्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येते. काँग्रेस लीडर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील साखर कारखाना दूध संघ शैक्षणिक संस्था याचबरोबर सर्व सहकार आणि तालुक्याचा होणारा विकास हे मॉडेल ठरणारे आहे. या सहकाराचा अभ्यास करून युरोपमध्येही हा पॅटर्न राबवता येणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून हा सहकार उभा केला आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातील सर्व संस्था या अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत. सर्व सभासद, उत्पादक, शेतकरी कामगार या सर्वांचे हित जोपासले जात असून यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत भरभराट आहे. ग्रामीण विकासातून आर्थिक समृद्धी निर्माण झाल्याने जागतिक पातळीवरील सर्व बँका संगमनेर शहरात असल्याचेही ते म्हणाले
यावेळी रणजीतसिंह देशमुख यांनी राजहंस दूध संघाची तर बाबा ओहळ यांनी कारखान्याची माहिती दिली. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सर्वांचे आभार मानले..