कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- विविधांगी लघुउद्योग – व्यवसाय सुरू करून प्रत्येक महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांना बळ दिले जाते. राहाता तालुक्यात ४० हजार महिलांचे संघटन आहे. यातून महिला सक्षमीकरण केले जात असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
कोल्हार भगवतीपूर येथे प्रवरा परिसरातील महिला बचत गटांना ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये स्वयंरोजगार विक्री केंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजार बँक, गटातील महिलांना बँक कर्ज वितरण सोहळा सौ. विखे पाटील यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे हे होते. याप्रसंगी प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कोल्हार बुद्रुकच्या सरपंच सौ. निवेदिता बोरुडे, उपसरपंच सौ. सविता खर्डे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, पाथरे बुद्रुकचे सरपंच उमेश घोलप, लोणीच्या सरपंच सौ. कल्पना मैड, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब कडू, विखे पा. ट्रक वाहतूक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, धनंजय दळे, दत्तात्रय खर्डे, साहेबराव दळे, भारत घोगरे, पंढरीनाथ खर्डे, ऋषिकेश खांदे, अमोल थेटे, श्रीकांत खर्डे, श्रीकांत बेद्रे, भाऊसाहेब रांधवणे, विलास खर्डे, पोपट खर्डे, राजेंद्र राऊत, प्रकल्प अधिकारी रूपाली लोंढे आदि उपस्थित होते.
सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, जिल्हा परिषदेमध्ये मला १० वर्षे काम करताना महिलांसाठी विविध योजना सुरू करता आल्या. २००९ सालापासून साई ज्योती प्रदर्शन भरविले जाते. यातून महिलांच्या उत्पादनाला व्यासपीठ मिळून रोजगार मिळाला. प्रत्येक महिला कर्तृत्ववान असते, फक्त त्यासाठी संधी मिळाली पाहिजे. महिलांना कोणतेही पद मिळाले तरी त्याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. जनरल नॉलेज असले पाहिजे. खुर्ची निव्वळ बसण्यासाठी नसते. बचत गटामुळे महिला हुशार झाल्या आहेत. ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांनी निरनिराळ्या शासकीय योजनांचा पाठपुरावा करून जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रवीण बारेकर यांनी योजनेसंबंधी माहिती दिली. प्रास्ताविक संभाजीराव देवकर यांनी केले. भाऊसाहेब चेचरे, ऋषिकेश खर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार स्वप्निल निबे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले.