राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून काल दिनांक ५ मार्च २०२४ रोजी १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून गजाआड केले. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली.
आरोपी ज्ञानदेव नारायण गर्जे हा सहाय्यक फौजदार असून तो राहुरी येथील पोलिस ठाण्यात कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची शहर बीटात नेमणुक होती. राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर एक वाईन शाॅपचे दुकान आहे. त्या ठिकाणी लिकर खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातून ग्राहक येत आहेत. त्या ग्राहकांवर व वाईन शाॅपवर कारवाई करु नये. यासाठी सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याने वाईन चालकाला दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली. तडजोड अंती १५ हजार रुपए देण्याचे ठरले. मात्र या दरम्यान वाईन चालकाने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलिमा डोळस, पोलिस नाईक संदीप हांडगे, पोलिस शिपाई सुरेश चव्हाण आदि पोलिस पथकाने काल दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान त्या वाईन शाॅप परिसरात सापळा लावला. त्यावेळी आरोपी ज्ञानदेव गर्जे याने वाईन शाॅप चालकाकडून १५ हजार रुपयांची लाच घेतली. त्या वेळी दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने झडप घालून आरोपी ज्ञानदेव गर्जे याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेत गजाआड केले.
याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी सहाय्यक फौजदार ज्ञानदेव नारायण गर्जे याच्यावर गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस प्रशासनाकडून सुरु आहे.