26.9 C
New York
Saturday, August 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

लायन्स, लिनेस व लिओ क्लबच्या ‘बिझनेस एक्स्पो’ मुळे कोपरगावच्या बाजारपेठेला चालना-रेणुकाताई कोल्हे

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव शहरात लायन्स, लिनेस व लिओ क्लबच्या वतीने गेल्या ११ वर्षांपासून दरवर्षी ‘बिझनेस एक्स्पो’ व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. या ‘बिझनेस एक्स्पो’ च्या माध्यमातून कोपरगावच्या स्थानिक बाजारपेठेला चालना मिळाली असून, व्यापारी, शेतकरी, महिला बचत गट, विद्यार्थी, युवक-युवती, महिला यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नागरिकांनी या ‘बिझनेस एक्स्पो’ ला भेट द्यावी आणि महिला बचत गटाच्या स्टॉलवरून वस्तूंची खरेदी करून महिला बचत गटांना हातभार लावावा व त्यांना साथ द्यावी, असे आवाहन संजीवनी इंग्लिश स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. 

लायन्स, लिनेस व लियो क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव शहरातील श्री साईबाबा तपोभूमी मंदिर परिसरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे ७ मार्च ते ११ मार्चपर्यंत ‘बिझनेस एक्स्पो २०२४’ व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, त्याचे उदघाटन गुरुवारी (७ मार्च) सायंकाळी थाटामाटात करण्यात आले. याप्रसंगी रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यंदा या ‘बिझनेस एक्स्पो’ व सांस्कृतिक महोत्सवाचे १२ वे वर्ष असून, संजीवनी उद्योग समूह त्याचा मुख्य प्रायोजक आहे.

याप्रसंगी रेणुकाताई कोल्हे म्हणाल्या, दरवर्षी लायन्स, लिनेस व लिओ क्लबच्या वतीने आयोजित केला जाणारा ‘बिझनेस एक्स्पो’ व सांस्कृतिक महोत्सव हा कोपरगावच्या वैभवात भर घालणारा एक स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यापारी व ग्राहकांना एकाच ठिकाणी एकत्र आणून स्थानिक बाजारपेठेला व उद्योग-व्यवसायांना उभारी देण्याचे चांगले काम होत आहे. यानिमित्ताने कोपरगावकरांना एक चांगली पर्वणी मिळते. दिवसेंदिवस या ‘बिझनेस एक्स्पो’ ला नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. लायन्स, लिनेस व लिओ क्लबने या ‘बिझनेस एक्स्पो’ च्या माध्यमातून व्यापारी, शेतकरी, उद्योजक, लहान-मोठे व्यावसायिक यांच्यासह महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महिला बचत गटाच्या महिला खूप मेहनत व काटकसर करून आपले घर चालवतात. स्वत:च्या पायावर उभे राहून जिद्दीने त्यांची वाटचाल सुरू आहे. महिला बचत गटाच्या उत्पादनांना या ‘बिझनेस एक्स्पो’च्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाली असून, नागरिकांनी महिला बचत गटाच्या स्टॉलवरून वस्तूंची खरेदी करून महिला बचत गटांना हातभार लावावा व त्यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ व ‘व्होकल फॉर लोकल’ अंतर्गत देशभरात विविध उपक्रम राबवून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी बाजारातून विविध साहित्यांची खरेदी करताना ‘व्होकल फॉर लोकल’ ही संकल्पना नक्की लक्षात ठेवली पाहिजे. विविध वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य दिले पाहिजे, जेणेकरून आपल्या भागातील व्यापारी, लहान-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ मिळू शकेल. लायन्स, लिनेस व लियो क्लबच्या ‘बिझनेस एक्स्पो’ ला व इतर विविध उपक्रमांना संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवराकडून यापुढील काळातही कायम सहकार्य मिळत राहील, अशी ग्वाही रेणुकाताई कोल्हे यांनी दिली.

उदघाटन समारंभास विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड, लिनेस क्लबच्या अध्यक्षा रोशनी भट्टड, लिओ क्लबचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे, ‘बिझनेस एक्स्पो’ समितीचे समितीचे राजेश ठोळे, राहुल नाईक, राम थोरे, नरेंद्र कुर्लेकर, संदीप कोयटे, वर्षा झंवर व अन्य पदाधिकारी तसेच सामाजिक, उद्योग, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेणुकाताई कोल्हे यांनी ‘बिझनेस एक्स्पो’ मधील महिला बचत गटाच्या व इतर व्यापारी, व्यावसायिकांनी लावलेल्या स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. उदघाटन समारंभापूर्वी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून श्री साईबाबा तपोभूमी मंदिर परिसरातील ‘बिझनेस एक्स्पो’ स्थळापर्यंत महिलांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला व युवती आकर्षक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!