संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या महिला टेनिस बॉल व रस्सीखेच स्पर्धेमध्ये संगमनेर तालुका व शहरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला असून ग्रामीण भागातील महिलांनी गाड्या भरून येत क्रिकेट पाहण्याचा व खेळाचा आनंद लुटल्याने दैनंदिन कामाच्या व्याप्तीतून महिला आनंदाने क्रिकेटमध्ये रमल्या असून मनमोकळ्या गप्पा आणि हास्यविनोदात एकवटल्या आहेत.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी 220 महिलांनी क्रिकेट खेळले. तरी 110 महिलांनी रस्सीखेच स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी सौ कांचनताई थोरात ,सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ व युवक काँग्रेस अध्यक्ष. डॉ. जयश्रीताई थोरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील महिलांच्या क्रिकेट सामन्याने रंगत आली अनेक गावांमधून टेम्पो व जीपमधून महिला स्टेडियम मध्ये आल्या .यानंतर स्पोर्ट किट व डोक्यावर कॅप घालून महिलांनी क्रिकेट खेळण्याचा व पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला.
इतर वेळी कायम घरगुती काम आणि शेतीच्या कामात व्यस्त असणाऱ्या महिलांनी नऊवार साडी ऐवजी परिधान केलेले स्पोर्ट किट ,डोक्यावर घातलेली कॅप, आणि एकमेकांना खेळण्यासाठी प्रोत्साहित केलेले वातावरण यामुळे संपूर्ण स्टेडियम आनंदाने भारावून गेले होते.
या मॅचच्या निमित्ताने मागील चार-पाच दिवसापासून गावागावात प्रॅक्टिस सुरू असून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात महिला क्रिकेटचा ज्वर वाढला आहे.
वडगाव लांडगा येथील ६५ वर्षी आजीच्या सहभागासह अनेक महिलांनीही या क्रिकेटमध्ये सहभाग घेतला तर महाविद्यालयीन मुलींच्या स्पर्धाही झाल्या.
प्रत्येक सामन्यातील चौकार आणि षटकारानंतर ढोल ताशांच्या गजरावर उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशन महिला सबलीकरणासाठी सुरू केलेल्या या कार्यातून अनेक महिलांना इतर गावांमधील महिला भगिनी मैत्रिणी म्हणून मिळाल्या असून यामुळे एकमेकींची ओळख झाली आहे .नवी जुनी मैत्री आणि हास्यविनोदाने एक भावनिक आणि आनंदाचे वातावरण संपूर्ण स्टेडियम मध्ये पहावयास मिळत आहे.