पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पारनेर येथे शनिवारी ,२३ मार्च रोजी महासंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.येथील ऐतिहासिक बाजार तळावर दुपारी १२ वाजता होणाऱ्या महासंवाद बैठकीचे नियोजन करण्यासाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाची बैठक नुकतीच पार पडली.मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी पारनेर तालुक्यातून जास्तीत जास्त अर्ज दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
मुंबई मोर्चाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी,मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गातून (कुणबी) आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.त्याच बरोबर कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा,त्यां कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी अधिसूचनेचे प्रारूपही प्रसिद्ध करण्यात आले.प्रारूपाची प्रत मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांकडे सूपूर्द केली.या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
या पार्श्वभूमीवर,सुरूवातीला टाळाटाळ करीत बोलावण्यात आलेल्या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणी बाबत चकार शब्दही न काढता, मराठा समाजाने कधीही मागणी न केलेले १० टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले.या प्रकारामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.
सगेसोयरे अधिसूचनेबाबत सरकारकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंतरवली येथे पुन्हा उपोषण सुरु केले.संतप्त झालेल्या मराठा समाजाने ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली.आंदोलन दडपण्यासाठी सरकारने मराठा आंदोलनाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली.
सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलन तीव्र करण्यासाठी, त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत महासंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीत, जिल्हा परिषद गट निहाय नियोजन करण्यात आले आहे.विविध माध्यमातून महासंवाद बैठकीचा प्रचार,प्रसिद्धी करण्यात येणार आहे.महासंवाद बैठकीस मराठा समाजासह अठरापगड जातींचे नागरिक उपस्थित राहणार असल्याने प्रचंड गर्दी होणार आहे.त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.पारनेर शहराच्या चारही बाजूंनी वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे.महासंवाद बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऐतिहासिक बाजार तळावर होणार ऐतिहासिक बैठक
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पारनेर बाजार तळाला सामाजिक, राजकीय व विविध चळवळींच्या सभांचा इतिहास आहे.स्वातंत्र्य संग्रामात थोर क्रांतिकारक सेनापती बापट यांच्या सभांनी पारनेरचा बाजारतळ दणाणला आहे.स्वातंत्र्यप्राप्ती नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान सेनापती बापट यांच्यासह एस.एम.जोशी,प्र.के.अत्रे यांची पारनेर बाजार तळावरील भाषणे गाजली आहेत.देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय सभाही गाजल्या आहेत.मनोज जरांगे पाटील यांची २३ मार्च रोजी होणारी महासंवाद बैठक बाजार तळावरील गर्दीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.