कोल्हार ( वार्ताहर ) :- माझ्या पतीचा ग्रामपंचायत कारभारामध्ये कुठलाही हस्तक्षेप नसून गावाचा कारभार पाहण्यासाठी मी सक्षम असल्याचा खुलासा कोल्हार खुर्दच्या सरपंच सौ. अनिता दिगंबर शिरसाठ यांनी केला आहे. माझ्यावर केलेल्या बदनामीकारक विधानाबद्दल कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, ग्रामपंचायतच्या विरोधी सदस्यांनी माझ्या पतीच्या ग्रामपंचायत कारभारातील हस्तक्षेबांबद्दल गटविकास अधिकारी व वर्तमानपत्रांना जे निवेदन दिले ते धादांत खोटे व बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे. मी व माझ्याबरोबर असलेले नऊ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचा कारभार स्वच्छ व उत्तम प्रकारे करण्यामध्ये सक्षम आहोत.
चार महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही ग्रामपंचायतचा कारभार हाती घेतला. तेव्हापासून आम्ही गावांमध्ये चाललेली लाचखोरी व ग्रामपंचायत हद्दीमध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायांबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच विरोधकांच्या मनात चलबिचल सुरू झाली. कारण कोल्हार खुर्द ग्रामपंचायतच्या ज्या सहा सदस्यांनी माझ्या विरोधात निवेदन दिले, त्यातील एका सदस्याच्या पतीचे गावामध्ये अवैध धंदे सुरू आहेत. दुसऱ्या एका सदस्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. तर आणखी एका सदस्याने कामगारांवर दबाव आणून भोगवटदार असताना मूळ मालक असल्याचा उतारा काढलेला आहे.
या सर्व गोष्टींची आम्ही सर्व माहिती घेत आहोत. त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल बदनामीकारक निवेदन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करून आणले. विरोधकांच्या वरील सर्व अवैध व बेकायदेशीर कामांचा आम्ही जनतेसमोर खुलासा करणार आहोत. माझ्यावर केलेल्या बदनामीकारक विधानाबद्दल कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे सौ. अनिता शिरसाठ यांनी सांगितले.




