राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-महात्मा फुले कृषी विद्यापीठात महिलेची छेड काढल्याने अभियंता विभागातील स्थापत्य मिस्तरीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या आधी असे काही प्रकार या मिस्त्री कडून घडले आहे पण ते जागेवर च रफादफा करण्यात आले आहे, प्रशिक्षणासाठी आलेल्या शेतकरी महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गणेश तुकाराम चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या मिस्तरीचे नाव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ नेहमीच कोणत्या न कोणत्या वादामुळे चर्चेत असते. विद्यापीठामध्ये शेतकऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असून त्यात महिला शेतकरी आहेत. प्रशिक्षणासाठी आलेल्या शेतकऱ्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी दि.२० सकाळी शेतकरी महिला आंघोळीसाठी गेली असता गणेश चौधरी याने खिडकीतून मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. घडलेल्या प्रकाराने शेतकरी महिलेने संताप व्यक्त करत वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
शेतकरी महिलेने थेट राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली. त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्यामध्ये स्थापत्य मिस्तरी चौधरी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही गैरकृत्यामुळे विद्यापीठाचे बांधकाम विभाग चर्चेत होता. त्यासंदर्भातील तक्रारी प्रलंबित आहेत. कागदपत्रे पूर्ण नसतानाही लाखो, कोटी रुपयांच्या निविदा खिरापतीप्रमाणे वाटल्या जात असल्याच्या चर्चेने बांधकाम विभाग चर्चेत आला होता. आता पुन्हा या नव्या घटनेने विद्यापीठ चर्चेत आले आहे. चुकीच्या कामकाजाला पाठबळ दिले जात असल्याने विद्यापीठामध्ये नको त्या गोष्टी पडू लागल्याची चर्चा सुरू आहे.
महात्मा फुले कृषीविद्यापीठामध्ये काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावे लाखो रुपयांची कामे घेतली जात आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची चर्चा होत आहे. तसेच विद्यापीठ अधिकारी व विद्युत अभियंत्यांच्या कृपेने अनेक चुकीचे कामकाज सुरू असल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आलेल्या आहे परंतू त्याच्या चौकशीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.