लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-आनंद घेण्यापेक्षा दाखवत फिरणारे खूप लोक भेटतात असे लोक अचिवमेंट सोसायटीचे असतात. असे लोक जास्त वेळ एका जागी बसू शकत नाही, परमार्थ करु शकत नाही, सेवा कार्य करु शकत नाही. त्यासाठी त्यांचा अटेंनशन स्टँड वाढला पाहिजे. साधे राहून विश्रांती घ्यायला शिकले पाहिजे. साधे राहणे संपले की विश्रांती संपते.नम्रता धारण करून संतांच्या चरणावर नतमस्तक झालो तर देव प्राप्ती होईल. ज्ञान हे ही एक भगवंत प्राप्तीचे साधन आहे. त्या साठी सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा. सचिन महाराज पवार यांनी केले.
श्री वरदविनायक सेवाधाम लोणी- शिर्डी येथे गुरुवर्य महंत उद्धावजी महाराज मंडलिक – नेवासेकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या प्रत्येक चतुर्थी कार्यक्रम निमित्त हरिकीर्तन सेवा पुणे विद्यापीठातील ह.भ.प. प्रा. सचिन महाराज पवार यांची झाली, त्यावेळी महाराज बोलत होते. महाराजांनी श्री संतांचिया माथा चरणावरी | साष्टांग हे करी दंडवत | या अभांगवर निरूपण केले.
ज्ञानी व संत या मधील फरक महाराजांनी सांगितला. धर्माला सेवा जोडणे अशा मिशन असणाऱ्या वृत्तीला सेवाधाम म्हणता येईल. असे माहात्म्य आपल्या सेवाधामला लाभले हे आपले भाग्य आहे. आर्धे लोक पूर्ण समस्या निर्माण करतात. त्यांच्या परफॉर्मन्सला टाळ्या मिळतात पण त्यातून समाधान मिळत नाही. म्हणुन संत सेवा करून त्यांचे पाया जवळ गेले की समाधान मिळते. ज्ञान स्वतंत्र करते, विचार करायला लावते. ज्याचेकडे वकृत्व असते त्यातून प्रसाद मिळेलच असे नाही. काही लोकं दुकानातील माल विकायला बसलेत, पण संत हे लोक घडवायला आलेत असेही महाराज म्हणाले. काम करणाऱ्यांची भूमिका ही जगाच्या कल्याणाकरिता असावी, जगाच्या उद्धारासाठी असावी ती संतामध्ये आहे. कोणतीही जिज्ञासा नसावी तर तारुण्य असावे. ज्ञान, वकृत्व याच बरोबर तारुण्य असणे खूप गरजेचे आहे. तुकाराम महाराज यांचे कडे हे सर्व गुण होते. संतांनी जातीचे शेण डोक्यातून काढले असे प्रखर शब्द महाराजांनी वापरले. म्हणून संपूर्ण शरणागतीसाठी साष्टांग दंडवत खूप गरजेचा आहे. पाय हे कष्टाची जाणीव करून देतात. सुख हे गंगे सारखे असते. बापाला समाधान मुलगाच देतो. तसे गुरूवर्य नारायणगिरी महाराजांना सुखी उद्धवजी महाराजांनी केले असे महाराज म्हणाले. म्हणून संतांच्या पायी नतमस्तक होऊन अटेनशन स्टँड घेतले पाहिजे. विश्रांती ही खूप गरजेची आहे. ज्ञानेश्र्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या घरात आपण जन्माला आलो म्हणुन ज्ञानेश्वरीवर, संत विचारावर आपलाच हक्क आहे असेही महाराज म्हणाले.
ह.भ. प. प्रा. सचिन महाराज पवार यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा माननिय सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केला. कीर्तन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर महाराज मंडळी व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कीर्तन श्रावणाचा आनंद घेतला. हरिकिर्तन झाल्यानंतर महाराज मंडळींचा व वेगवेगळ्या प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा गुरुवर्य बाबांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. सेवाधामचे प्रमुख गुरुवर्य बाबा ह.भ.प.महंतं उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांनी उपस्थित भाविक भक्तांचे स्वागत करून आभार मानले . या कीर्तनप्रसंगी पंचक्रोशीतील भजनी मंडळी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.