लोणी दि.४( जनता आवाज वृत्तसेवा ):-विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत ग्राम विकास अभियानातून समृद्ध आणि सक्षम युवा पिढी घडवण्याचे काम करतांना. सम सखळा पाहू आणि मानवता हाच खरा धर्म आहे ही शिकवण श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गातून दिली जात असून भक्ती पुढे शक्ती नतमस्तक होत असते. चिंतामुक्त होण्यासाठी चिंतन करा असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांनी केले.
राहाता तालुका श्री स्वामी समर्थ सेवा समिती आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणी यांच्या वतीने आयोजित सत्संग आणि अमृततुल्य हितगुज प्रसंगी चंद्रकांत दादा मोरे हे बोलत होते. यावेळी यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, चैतन्य मोरे, प्रांत प्रमुख विजय कडू, जिल्हाप्रमुख माणिकतात्या वडतेले, तालुकाप्रमुख प्रकाश पुलाटे, सुनील जाधव,रावसाहेब शेजुळ, निखिल विखे, रमेश सुपेकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात चंद्रकांत म्हणाले, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या माध्यमातून २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा या युक्तीतून मोफत आरोग्य शिबिर मोफत, औषधी वाटप, महा वस्त्रदान, अन्नदान, स्वच्छता अभियान यासारखे अनेक सामाजिक उपक्रम गुरुपीठाच्या माध्यमातून सुरू आहेत. याशिवाय गुरु पिठाच्या माध्यमातून सदगुरु मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गरजूंना आरोग्य सेवा देखील लवकरच प्रदान केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विश्वकल्याणासाठी राष्ट्रीय उन्नतीसाठी या मार्गाच्या माध्यमातून ग्रामविकास अभियान महत्त्वपूर्ण असं ठरलं आहे. या माध्यमातून बालसंस्कार, आयुर्वेद, अध्यात्म, वास्तुशास्त्र, स्वयंरोजगार, हस्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, भारतीय अस्मिता, मानवाच्या विविध समस्या आदी विषयावरती या मार्गाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. जेथे सर्वजण असमर्थ तेथे समर्थ स्वामी असतात. स्वामी महाराजांचे आशीर्वाद आपल्या सोबत नेहमी असण्यासाठी मनोभावे सेवा करा सेवा करा मेवा खा असं सांगतानाच आदर्श समाज निर्मितीसाठी सर्वांनी आता एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दानाचे महत्त्व विशद करतांना आपणही दानधर्मातून पुण्य कमवा कारण या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना वाढीस लागते असेही चंद्रकांत दादा यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाला शुभेच्छा देतांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी डोळस कार्यावरती हा मार्ग आधारित आहे. अंधश्रद्धा बाजूला ठेवून ग्रंथांचे महत्त्व समजून घेत असतांना आदर्श युवा पिढी घडवण्यासाठी बाल संस्काराला महत्त्व द्या असे आवाहनही सौ. विखे पाटील यांनी केले.शेवटी आभार प्रा.पायल विखे यांनी मानले.
मेळाव्यानिमित्त श्री स्वामी समर्थ गुरुपीठ स्वयंरोजगार विभाग आणि लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्लेसमेंट विभागा अंतर्गत आयोजित रोजगार भरती मेळाव्यातून विविध कंपन्यामध्ये २१९ युवकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली.