श्रीरामपूर- ( जनता आवाज वृत्तसेवा)- मुळा प्रवरा वीज संस्थेच्या प्रशासक मुदतवाढ बाबतचा तिढा अद्यापही कायम आहे.जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडून धाडण्यात आलेले पत्र सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांना अद्यापही न मिळाल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
मुळा प्रवरा वीज संस्थेचे तत्कालीन प्रशासक रावसाहेब खेडकर यांचा एप्रिल २०२४ मध्ये प्रशासक पदाचा कार्यकाळ संपला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे पद रिक्त आहे.खेडकर यांनी जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांना या संदर्भात पूर्व कल्पना दिली आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत गेल्या तीन वर्षांपूर्वीच संपुष्टात आली आहे. संस्थेची निवडणूक होत नसल्याने तेथे प्रशासक नेमावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे यांनी ॲड. अजित काळे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली होती.
न्यायालयाने हे मागणी तातडीने मंजूर करत राहत्याचे सहाय्यक निबंध रावसाहेब खेडकर यांना एक वर्षभरासाठी प्रशासक म्हणून नेमले होते. खेडकर यांनी जिल्हा उपनिबंधक पुरी यांना कार्यकाळ संपला असल्याबाबतची कल्पना दिली आहे.
पुरी यांनी या संदर्भात खेडकर यांच्याकडे गेल्या वर्षभराचा संपूर्ण अहवाल मागविला असून मात्र तशा प्रकारचे जिल्हा उपनिबंधक पुरी यांनी खेडकर यांना पाठ विलेले पत्र अद्यापही मिळाले नाही.यामुळे संस्थेच्या प्रशासक पदाचा तिढा अद्यापही कायम आहे.