कर्जत( जनता आवाज वृत्तसेवा ):- नगर-करमाळा महामार्गासाठी १०३१ कोटी रुपये आणून या महामार्गाचे काम मार्गी लावल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या मार्गावर बायपास गेलेल्या चार गावांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल २२.३८ कोटी रुपये मंजूर करुन आणले आहेत. याबाबत त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
कर्जत- जामखेडचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर रोहित पवार यांनी मतदारसंघातील रस्ते सुधारणेवर जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार कोटी रुपये केवळ रस्त्यांसाठी मंजूर करुन आणले. त्यामुळे आज रोजी कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यांमध्ये अमूलाग्र बदल झाल्याचे दिसत आहे. रस्त्यांची अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे ही सुरु आहेत.
नगर- करमाळा रस्त्यासाठीही आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करुन १०३१ कोटी रुपये मंजूर करुन आणले आहेत. आणि हे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या मार्गावर कर्जत तालुक्यातील मिरजगाव आणि माहीजळगाव या गावांना बायपास दिला आहे.
या गावांतील अंतर्गत रस्ते लहान आणि खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे खराब झालेल्या या अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठीही निधी देण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. आणि प्रत्यक्ष भेटही घेतली होती. या वेळी श्रीगोंदा तालुक्यातील रुईछत्तीसी आणि घोगरगाव, या गावांमध्येही बायपास देण्यात आला असून, तेथील रस्त्यांबाबतची चर्चा झाली.
त्यानुसार बायपास दिलेल्या या चारही गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी नॅशनल हायवेकडून २२.३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आणि हे काम करण्यासाठीची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर या चारही गावातील अंतर्गत वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण घटेल आणि स्थानिक व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक, या सर्वांसह स्थानिक बाजारपेठेलाही याचा मोठा फायदा होईल.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या तीन महामार्गांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांनी यापूर्वी १६०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच आताही मी केलेल्या विनंतीनुसार नगर-करमाळा रस्त्याला बायपास दिलेल्या गावांमधील अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी त्यांनी २२.३८ कोटी रुपये मंजूर मंजूर केले. विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करणारे नेते ही ओळख गडकरी साहेबांनी पुन्हा एकदा सिद्ध केली. याबाबत माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो.
– आ. रोहित पवार