नाशिक ( जनता आवाज वृत्तसेवा):-भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक तथा आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांनी संगीता विसपुते, महेंद्र विसपुते, शाम जाधव, डॉ.सीमा कांबळे, अनेक मित्र, पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज आज दि.०७ रोजी नाशिक विभागीय कार्यालय, नाशिक येथे आज दाखल केला.
धनराज विसपुते हे स्वतः अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने आणि शिक्षकांच्या समस्यांवर ते प्रभावीपणे काम करत आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षात पदवीधर आणि शिक्षक यांच्या कामाचा धडाका लावला असून मागील पदवीधर निवडणुकीमध्ये वैयक्तिक स्तरावर ८९३९८ इतक्या संख्येने पदविधरांची नोंदणी करून केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे शेवटच्या क्षणाला त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
परंतु त्यानंतरही ते थांबले नाहीत लगेचच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या नाव नोंदणीसाठी त्यांनी वैयक्तिक स्तरावर त्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू केले. या कालखंडामध्ये पूर्ण महाराष्ट्र दौरे, शिक्षकांशी संवाद, शाळा भेटी , शिक्षक आणि पदवीधर मेळावे अशा असंख्य कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला. या दरम्यान शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करणे, आंदोलनात सहभाग घेणे ,शिक्षकांच्या समस्या सोडवणे यासाठी ते अग्रेसर राहिले. आता नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक २६ जूनला येऊ घातलेली आहे ,
या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता वैयक्तिक पातळीवर हजारो शिक्षकांशी आपण संपर्क साधला असून त्यातील ३२३९८ शिक्षकांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचे सांगितले आहे .मागच्या वेळेस पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे मी थांबलो असलो तरी यावेळेस माझा पक्ष नक्कीच मला संधी देईल हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी वैयक्तीक स्तरावर केलेली मतदार नावनोंदणी आणि शिक्षकांशी व शिक्षणसंस्था चालकांशी असलेला दांडगा संपर्क यामुळे येणारे कोणतेही आव्हान स्वीकारण्यास मी तयार आहे असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.