नगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- पावसाने शहर व उपनगरांत चांगलीच दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. यानिमित्ताने महानगरपालिकेचे आपत्तिव्यवस्थापन केवळ कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
सुमारे दीड तास पडलेल्या या पावसामुळे महानगरपालिकेच्या ढिसाळ आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्याचे सत्य समोर आले. पावसाळ्यापूर्वी हा आराखडा तयार करून, वेळप्रसंगी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे.
घरातील पाणी उपसण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल झाले. बहुतेक भागांतील वीजपुरवठा पावसामुळे खंडित झाला होता. तो पुर्वरत झाला.
व्यावसायिकांचे हाल
अहमदनगर शहरातील सर्जेपुरा, दिल्ली गेट चौपाटी कारंजा, माळीवाडा यासह सावेडी, भिंगार, केडगाव, नवनागापूर पाईपलाईन रोड तपोवनरोड या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अहमदनगर शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यावसायिकांची मोठी दाणादाण उडाली.
मशागतीला सुरवात…
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीगोंदा, श्रीरामपुर, जामखेड, संगमनेर, कोपरगाव आदी ठिकाणी पावसाचे आगमन झालेले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे सुरु केली आहेत. कपाशी लागवडीस सुरुवात झाली आहे. तर कुठे पेरणीसाठी सुरुवात झाली आहे.