spot_img
spot_img

सकारात्मक जीवनाचा आदर्श म्हणून शिवचरित्राचा  अभ्यास व अनुकरण करणे गरजेचे – जळकेकर महाराज

संवत्सर( जनता आवाज वृत्तसेवा):-छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, पराक्रम, शुरता, निर्णयक्षमता हे गुण सर्वांसाठीच प्रेरणादायी असून आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या, अनिश्चित काळातही आनंदी राहण्यासाठी सकारात्मक जीवनाचा आदर्श म्हणून शिवचरित्राचा अभ्यास व अनुकरण करणे अतिशय गरजेचे आहे असे उद्‌गार जळके, जि. जळगांव येथी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २० व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून ” शिवचरित्र : प्रेरणादायी वाटचाल ” या विषयावर ह. भ. प. जळकेकर महाराज बोलत होते. ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, ह. भ. प. मनसुख महाराज दहे, विनायक महाराज वाघ, सुभाष महाराज जगताप, महंत दामोदरबाबा महानुभाव, महंत नितीनबाबा महानुभाव यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य आहे. राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक युवकाने छत्रपतींच्या व्यूहनीतिचा साकल्याने विचार अन् अंगिकार करणे आजच्या काळाची गरज असल्याचे सांगून ह. भ. प. जळकेकर महाराज पुढे म्हणाले, शिवाजी महाराज बुध्दिप्रामाण्यवादी, प्रयत्नवादी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी कधी भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहिला नाही. कर्मकांडावर विश्वास न ठेवता स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. प्रजेचे रक्षण, त्यांचे कल्याण, त्यांना संकटात मदत करणे हेच खरे पुण्य असल्याचा त्यांचा दृष्टीकोन होता. शिवरायांचे व्यवस्थापन आधुनिक युगात देखील सर्वांसाठी प्रेरणादायी व उपयुक्त आहे. जलव्यवस्थापन, वृक्षसंवर्धन, रयतेविषयी प्रेम आस्था, काळजी आणि गडकोट किल्यांची मजबूत बांधणी, युध्दनीती या सर्व गुणांमुळेच ते आजही संपूर्ण विश्वात वंदनीय तर आहेच, परंतु कोणाशी कधी युती करायची आणि कोणाशी कथी आघाडी करायची याबाबतीत शिवाजी महराज तज्ज्ञ होते. राजकारण हा देखील त्यांच्या विलोभनीय प्रतिभेचा आविष्कार होता.

चारित्र्य आणि चरित्र कसे असावे, हे शिवारायांच्या जीवनातील अनेक प्रसंगामधून अनुभवायला मिळते. परस्त्रीला माता म्हणणे हे शिवरायांचे संस्कार भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी तेजोमय अशी प्रेरणा आहे. शिवरायांनी मोठा गौरवशाली इतिहास आम्हाला दिलाय. त्या इतिहासाकडे पाहिल्यानंतर आमचं भविष्य देखील गौरवशाली आहे हे पटल्याशिवाय रहात नाही. हे गौरवशाली भविष्य घडवायचे असेल तर, इतिहासाकडे कटाक्ष टाकणे, इतिहास समजावून घेणे आणि त्या इतिहासाचे वारस म्हणून त्या इतिहासाच्या पदचिन्हांचा मागोवा घेत त्यावरुन मार्गक्रमण करीत राहणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. महाराजांचे शौर्य आणि युध्दीमत्ता युगानुयुगे आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामांन्याचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करीत शत्रू पक्षावर मात करुन मराठ्यांचे नांव जगाच्या इतिहासात अजरामर करुन ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आजच्या समाजासाठी प्रेरणादायी वाटचाल असल्याचेही मार्गदर्शन ह. भ. प. जळकेकर महाराज यांनी केले.

ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. उध्दव महाराज मंडलिक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सद्याच्या धावपळीच्या युगात परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालल्याने जिकडे तिकडे अराजकता वाढत आहे. अहंभाव दूर करण्यासाठी मनाची कवाडे उघडी करा. संस्काराने, विचारचे धन जोडता आले तर जीवन धन्य होईल. नामदेवराव परजणे आण्णांसारखी मोठ्या मनाची माणसे आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहेत. त्या प्रेरणेतून समाज घडावा, विश्वबंधुत्वाची भावना प्रत्येकांमध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षाही मंडलिक महाराज यांनी व्यक्त केली.

जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी स्व. परजणे आण्णांच्या स्मृतींना उजाळा देताना मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांना तळमळ होती. गोरगरीब मुली अनेक अडचणीमुळे शिक्षण घेवू शकत नाहीत याचे त्यांना नेहमीच दुःख वाटत होते. त्यांचे ते स्वप्न आज पूर्ण झालेले आहे. कोपरगांव, संवत्सर, पुणतांबा अशा ग्रामीण परिसरात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शिक्षणाकडे मुलींचा कल वाढलेला असल्याचे सांगितले. सर्वसामांन्याविषयीची आण्णांच्या मनातली तगमग पाहिली की, त्यांची परोपकारी वृत्ती लक्षात येते. त्यांच्या कार्याचे मोल शब्दातून व्यक्त होणार नाही. अशा शब्दात सौ. विखे यांनी परजणे आण्णा यांच्या स्मृतींना अभिवादन करून आभार व्यक्त केले.

नामदेवराव परजणे पाटील यांच्या ” जीवन आणि कार्याची प्रेरणादायी वाटचाल ” या माहितीपटाच्या स्कॅनकोडचे अनावरण उध्दव महाराज व जळकेकर महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामदेवराव परजणे पाटील शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले. कोपरगांव येथील महिला महाविद्यालयाच्या ” कुपासिंधू ” नियतकालिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. तसेच संवत्सर येथील बाळासाहेब सहाणे टेलर यांच्यातर्फे कोपरगांव येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!