नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्हा परिषदेतील अनेक विभागात अर्ज करायचे असतील ते अर्ज प्रशासनाकडून उपलब्ध होण्याऐवजी ते कॅन्टिंगमधून घेण्यात यावे, असे कर्मचारी सांगत आहे. जे अर्ज मोफत आहेत त्यासाठी अभ्यगतांना पैसे खर्च करावे लागत आहे. मात्र मुख्यालयातील हे अर्ज कॅन्टिंगपर्यंत कसे गेले, याचा प्रशासनाने शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
सध्या जिल्हा परिषदेत आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातयं असाच कारभार जिल्हा परिषदेचा सुरु आहे. या कारभाराला कर्मचा-र्यांसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्यचे नेत्यांसह सर्वसामान्य कंटाळलेले आहेत. अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार जिल्ह्यात सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात जसा कारभार सुरु आहे.
तसाच कारभार पंचायत समित्यांमध्ये सुरु आहे. विशेष म्हणजे पंचायत समित्यांमध्ये सकाळी पावणेदहा वाजता कर्मचारी दिसून येतात. त्यानंतर अनेक कर्मचारी गायब होत आहे. ते थेट साडेपाच वाजताच कार्यालयात दिसत असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. परंतु याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुक्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासनचे दुर्लक्ष झालेले आहे.पंचायत समित्यांमधील काही कर्मचारी जेवणाच्या सुटीत घरी जात असून थेट कार्यालय बंद होण्याच्या वेळीच कार्यालयात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत.
मात्र त्यांच्याकडून ठोस कारवाई झालेली नाही. यावरून अधिकारी व त्यांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील काही विभागातील कर्मचार्यांनी कार्यालयात विविध प्रकारात करण्यात येणारे अर्जाचे नमुने झेराॅक्स दुकानांमध्ये दिलेले आहे. हे अर्ज करण्यासाठी कोणी आले तर थेट त्या दुकानांचा पत्ता दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील बऱ्याच विभागातील कर्मचारी थेट कॅन्टिंगचे नाव सांगून तेथून अर्ज घेण्यास सांगत आहेत. संबंधित कर्मचारी व त्या अर्ज विक्री करणाऱ्यांचे काही लागेबांधे आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कॅन्टिंग की झेराॅक्स दुकान
जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या आवारात कॅन्टिंगचे टेंडर दिलेले आहे. मात्र तेथे कॅन्टिंगबरोबरच झेराॅक्स कसे सुरु करण्यात आले. त्याला कोणाची परवानगी आहे, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
कर्मचारी बाहेरी व्यक्तींना देतात माहिती
जिल्हा परिषदेतील कर्मचारी सध्या आपल्याला कामाचा ताण नको म्हणून अर्ज बाहेरील व्यक्तींकडे विक्रीस उपलब्ध करून देतात. तेथून अर्ज खरेदी करावे, याबाबत सूचित करतात, त्यातून त्या झेराॅक्स केंद्राचा व्यवसाय होतो. मात्र यातून संबंधित कर्मचार्यांना नफा होत असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु आहे.