राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहाता तालुक्यातील कोर्हाळे येथील जाधव वस्तीवर शेत जमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून स्वतःच्या बापाचा खून करणारा फरार आरोपी मुलगा अखेर राहाता पोलिसांनी सापळा रचून गजाआड केला.
राहाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 जुन 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारस गणपत संभाजी कोळगे (वय 80, रा. जाधववस्ती कोर्हाळे, ता. राहाता, जि. अ.नगर) यांना त्यांचा मुलगा अनिल गणपत कोळगे (वय 53) याने शेतजमीन त्याच्या नावावर करून देण्याच्या कारणावरून ते राहत असलेला घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लाकडी काठीने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला आहे. म्हणुन राहाता पोलीस स्टेशनला गु.र.नं. 300/2024 भा.द.वि. क.302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पो.नि. सोपान काकड हे करीत आहे.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अनिल गणपत कोळगे (वय 53, रा.कोर्हाळे, ता. राहाता) हा गुन्हा केल्यापासुन फरार होता. दि.28 जून 2024 रोजी सकाळी 10.10 वाजेच्या सुमारास आरोपी हा अस्तगाव फाटा येथे येणार असल्याची गोपनिय माहिती बातमीदाराकडुन पो. ना. विनोद गंभीरे यांना मिळाली. त्यांनी सदरची माहीती पो. नि. सोपान काकड यांना दिली. त्यानी तात्काळ पो. ना. गंभीरे व पो. कॉ. शिंदे यांना सदर ठिकाणी रवाना केले.
पोलीस अंमलदार हे तेथे जावुन सापळा लावुन बसले असता काही वेळाने आरोपी तेथे पायी चालत आल्याने त्यास हटकताच तो पळू लागला. यावेळी पोलीस पथकाने ताब्यात घेतले आणि त्याला पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. संबंधित आरोपींनेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधीकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. नि. सोपान काकड, पो.स.ई कमलाकर चौधरी, पोहेकॉ विशाल पंडोरे, पोहेकॉ श्रीकांत नरोडे, पोना विनोद गंभीरे, पोकॉ संभाजी शिंदे यांनी केली आहे.




