श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- विठु नामाच्या गजरात व निवृत्तीनाथ महाराजांच्या जयजयकारात त्र्यंबकेश्वरहून आषाढी एकादशीसाठी पंढरपुरला निघालेल्या संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडीचे श्रीरामपूर नगरीमध्ये भव्य स्वागत झाले. लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. श्रीरामपूरला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते.
जुन्या संगमनेर नाक्याजवळ पालखीचे स्वागत प्रांताधिकारी किरण सावंत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपाध्यक्ष करण ससाणे, माजी नगरसेवक अशोकराव कानडे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फंड, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश कोठारी व संचालक मंडळ, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, भाजपाचे प्रकाश चित्ते, मिलिंद साळवे, लोकसेवा आघाडीचे सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, अरुण पाटील नाईक, आण्णासाहेब डावखर, गौतम उपाध्ये, संजय कोठारी, संजय गाडेकर, वर्धमान पाटणी, राहुल कोठारी, हरीभाऊ आजगे आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
दिंडीतील भाविकांना संगमनेर रोड, नेवासा रोड, बेलापूर रोड आदी रस्त्यावर पाणी, केळी, भजी, साबुदाणा खिचडी, बिस्कीट पुडे व भोजनाचे अनेक स्टॉल लागलेले होते.
मेनरोडवर तृतीयपंथीयांच्या वतीने वारकर्यांचे स्वागत करून त्यांना बिस्टीकाचे पुडे व पाण्याचे पाऊच वाटले. मराठा महासंघाने बेलापूर रोडवर वारकर्यांना खिचडी प्रसाद दिला.
नॉर्द्रन ब्रँचजवळ निवृत्तीनाथांची पालखी रथातून खाली उतरवून तरुणांनी विठुनामाच्या जयजयकारात शोभायात्रेने मेनरोड मार्गे श्रीरामपूर मंदिरात आणली. मंदिरामध्ये मंदिराचे विश्वस्त प्रणिती गिरमे, रोहन गिरमे, दिनेश सुर्यवंशी व उपाध्ये परिवार यांच्या वतीने पालखी व पादुकांची धार्मिक पुजा-अर्चा करण्यात आली.
पालखी व दिंडीचे मानकरी ह. भ. प. मोहन महाराज हिरवे, बेलापुरकर, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण डावरे महाराज हे नेतृत्व करीत असून दिंडीमध्ये पालखी सोहळ्याच्या प्रथमच महिला अध्यक्ष कांचनताई जगताप, विश्वस्त राहुल साळुंके, पालखी सोहळा प्रमुख नवनाथ गांगुर्डे, नारायण मुठाळ, श्रीपाद कुलकर्णी, माधवदास राठी, अॅड. घोटेकर आदी यावेळी दिंडीत सहभागी झाले होते.
दिंडीतील भाविकांना शेतकरी, व्यापारी, कांदा व्यापारी, भुसार व्यापारी, भाजीपाला व्यापारी आदींच्या वतीने भंडारा देण्यात आला. दिंडीतील बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. पालखीच्या स्वागतासाठी शासकीय अधिकारी आजी, माजी नगरसेवक, शिवसेना, उबाठा, आम आदमी पार्टी, विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी रस्त्यावरील कागद, प्लेटा, केळांची सालपट आदी तातडीने उचलून रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी परीश्रम घेतले. भाविकांनी रस्त्यावर रांगोळी काढून सडे टाकून पालखीचे स्वागत केले.
कृषक समाजाच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिंडीतील वारकर्यांना प्राथमिक उपचारासाठी औषधाचे किट व बिस्कीट पुडे यावेळी वाटले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास कणसे व कार्यकर्ते अविनाश पोहेकर, आदिक यावेळी उपस्थित होते.
निवृत्तीनाथांच्या पालखीच्या दर्शनासाठी शहरातील रस्त्याने भाविकांची दुतर्फा गर्दी दिसत होती.उपाध्ये यांच्या निवासस्थानी श्रीरामपुरकरांच्या वतीने पालखीचे मानकरी मोहन महाराज व पालखी सोहळ्याचे अध्यक्ष कांचनताई जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कांचनताई जगताप यांनी श्रीरामपुरकांनी स्वागत केल्याबद्दल आभार मानून प्रत्यक्षात निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन श्रीरामपुरकरांना लाभले असे म्हणावे लागेल, असे म्हणाल्या. मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कोठारी यांनी आभार मानले.




