राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- गेले काही दिवसापासून दूध उत्पादक व सरकारमध्ये दूध दरावरुन चालू असलेला संघर्ष हा टोकाला गेल्याचे चित्र पहावयाचे मिळत आहे . दुधाला किमान 40 रुपये दर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून आठ दिवसात दुधाला अनुदानाचा निर्णय झाला नाही तर मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखण्याचा गंभीर इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये आज रास्ता रोको आंदोलन केले. तसेच राज्य सरकारला आठ दिवसाचा कालावधी दिला आहे.
पीक विमा कंपन्यांनाच जास्त फायदा होत असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजना कॉर्पोरेट योजना असल्याचे वाटते, असा आरोपही शेट्टी यांनी केला. त्यामुळे विमा कंपनीला या योजनांचा किती फायदा होतोय, यावर एका श्वेतपत्रिका काढण्याची मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप देखील या वेळी शेतकऱ्यांनी केला आहे.
दुधाला किमान 40 रुपये दर मिळण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी राजू शेट्टी यांच्यासह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील उपस्थित होते. त्या नंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. तसेच दुधाला दर देण्यासाठी आम्ही आठ दिवसांची मुदत देत असल्याचेही शेट्टी यांनी या वेळी सांगितले. तसे झाले नाही तर मुंबईला जाणारा दूध पुरवठा थांबवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
दुधाची शिखर संस्थाच दुसऱ्यांना देण्याची वेळ; शेट्टी यांचा आरोप एकेकाळी महाराष्ट्रातच दुधाचे भाव निश्चित होत होते. दुधाचे धोरण ठरवण्याआधी महाराष्ट्राकडे पाहिले जात होते. मात्र, आता दुधारी शिखर संस्थाच दुसऱ्यांना देण्याची वेळ आली असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला आहे. दुधाचे दर 12 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर अनुदानाचा निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. यासाठी दुग्धविकास मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचे निमंत्रणही आपल्याला नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दूध पावडर आयातीच्या निर्णयावरही या वेळी शेट्टी यांनी टीका केली.




